ओढे-नाले बुजविलेल्या भूखंडावर तुर्तास बांधकामांना परवानगी नाही

ओढे-नाले बुजविलेल्या भूखंडावर तुर्तास बांधकामांना परवानगी नाही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील उपनगर परिसरात 41 ओढे व नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह पाईप टाकून बंद करण्यात आले आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे 95 किमी लांबीच्या ओढे व नाल्यांपैकी 8.23 किमी लांबीचे प्रवाह पाईप टाकून वळविण्यात आल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत ओढे व नाले बुजविलेल्या ज्या भूखंडावर बांधकाम झालेले नाही अशा ठिकाणी तूर्तास बांधकामांना परवानगी देणार नसल्याचे मनपा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या नाल्यांची रुंदी निश्चित करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आल्याचेही आयुक्त पंकज जावळे यांनी सांगितले.

पाईप टाकून ओढे व नाले बुजविण्यात आल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते. यासंदर्भात शशिकांत चंगेडे हे गेल्या अनेक वर्षांपासून तक्रारी व पाठपुरावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नाशिकच्या कंपनीमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील सुमारे 95 किमी लांबीच्या 41 ओढे व नाल्यांवर 8.23 किमीपर्यंत अतिक्रमण झालेले आहे.

यात 4.91 किमी लांबीचे नाले सद्यस्थितीत मोकळ्या जागेत असून ते पाईप टाकून बुजविण्यात आले आहेत. अशा जागांचे सर्वेक्षण करून तेथील मंजूर असलेले लेआउट रद्द करण्यासंदर्भात व नव्याने सुधारीत लेआउट मंजूर करण्यासंदर्भात प्रक्रिया केली जाणार आहे. या मोकळा भूखंडावरील प्रवाह मोकळे केले जाणार आहेत.

दरम्यान बुजवलेले ओढे व नाल्यांचे प्रवाह मोकळे करण्यासाठी, ज्या ठिकाणी इमारती उभ्या आहेत, त्याबाबत पुढील कार्यवाही निश्चित करण्यासाठी, तसेच ओढे व नाल्यांच्या संदर्भात यापुढील प्रक्रिया करण्यासाठी नगररचना विभागात निवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. भविष्यातील घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असून त्यादृष्टीने निर्णय घेण्यासाठी प्रशासन कार्यवाही करत असल्याचे आयुक्त जावळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com