बुजवलेल्या ओढ्या-नाल्यांची पाहणी करा

जिल्हाधिकार्‍यांचे मनपाला आदेश
बुजवलेल्या ओढ्या-नाल्यांची पाहणी करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील बुजवलेले ओढे-नाले तसेच सिमेंट पाईप टाकून वळवलेले नाले व सीना नदीपात्रासह ओढ्या-नाल्यांतील अतिक्रमणाची स्थळ पाहणी तक्रारदार नागरीक कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांच्यासमवेत करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना दिले आहेत.

दरम्यान, तक्रारदार चंगेडे यांनी शहरातील 21 ठिकाणी ओढे-नाले बुजवल्याचा दावा केला आहे तर मनपाने शहरात 140 ठिकाणी पावसाचे पाणी साठते, असे या बैठकीत स्पष्ट केल्याने आता या सर्व ठिकाणांची पाहणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर होणार आहे. शहरातील ओढे-नाले संदर्भात चंगेडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक मंगळवारी घेतली. आयुक्त डॉ. जावळे, तक्रारदार चंगेडे, अभियंता सातपुते आदी उपस्थित होते.

तक्रारदार चंगेडे यांनी ओढ्या-नाल्यांतील अतिक्रमणाबाबत तक्रारी करूनही मनपाने बैठका का घेतल्या नाहीत? त्यांच्या ई-मेल तक्रारीला उत्तरे का दिली नाहीत? ओढ्या-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह का बदलले? त्यात पाईप कोणत्या कायद्याने टाकले, कोणी टाकले? तुम्ही (मनपा) किती टाकले व लोकांनी किती टाकले?, अशा अनेकविध प्रश्नांची विचारणा मनपा आयुक्तांना या बैठकीत झाली. मी आताच आयुक्त म्हणून मनपात रूजू झाल्याने याची सविस्तर माहिती घेतो, असे डॉ. जावळेंनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com