मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 8 जणांना चावा

मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 8 जणांना चावा

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

करोनाचे संकट घोंगावत असतानाच अस्तगाव येथे रात्रीतून एका मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 8 जणांना चावा घेतला. यात दोन वृध्द व्यक्तींचा समावेश आहे. या कुत्र्याचा वावर काल दिवसभर दिसून येत होता. या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

अस्तगाव गावठाण, गोर्डे वस्ती, तसेच चोळकेवाडी या परिसरात काल सकाळी या कुत्र्याने चावा घेतला. मोकट पिसाळलेले कुत्रे असल्याने अस्तगाव परिसरात घबराट पसरली आहे. जनावरे व शेळ्या या कुत्र्यापासून सुरक्षित राहाव्यात म्हणून काहींनी रात्र जागून काढली.

ज्यांना ज्यांना चावा घेतला त्यांना रॅबिपूर अथवा एआरव्ही हे इंजेक्शन अस्तगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्याने खाजगी मेडिकल दुकानातून आणून ते प्राथमिक केंद्रातून इंजेक्शन या नागरिकांनी टोचून घेतले. यातील एका वृध्द व्यक्तीला जास्त चावा घेतला गेला असल्याने त्यांना नगर येथे हलविण्यात आले होते. तेथे इमोनोग्लोब्युलिन इंजेक्शनचे रिअ‍ॅक्शन आल्याने त्या व्यक्तीस पुणे येथे हलविण्यात आले आहे.

या मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या कुत्र्यापासून सावध राहावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रवींद्र गोर्डे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com