महावितरणचा अजब कारभार

कर्मचाऱ्यांचा ट्रान्सफार्मर बंद करण्यातही दुजाभाव
महावितरणचा अजब कारभार

हनुमंतगाव (वार्ताहर)

महावितरणच्या ढिसाळ कारभाराने कळस गाठला असून बिलापोटी ट्रान्सफार्मर बंद करण्याचा धडाका उठविला आहे. परंतु महावितरणच्या कार्यालयाकडून सरळ सर्व ट्रान्सफार्मर बंद केले जात नाही. ठराविक ट्रान्सफार्मरनाच टार्गेट केले जाते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. काही बडी शेतकरी ग्राहक असलेले ट्रान्सफार्मर बंद केले जात नसल्याचे दिसून येत आहे.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कार्यवाही चालू आहे, असे सांगितले जाते. शेतकरी ज्यांच्या मोटारी बंद आहेत ते हजार ते दोन हजार फूट नवीन केबल आणून चालू ट्रान्सफॉर्मरवरून कनेक्शन घेतात. पाच हजार रुपये भरण्यापेक्षा तेवढ्या किमतीची केवल आणून मोटारी चालू करणे शेतकऱ्यांना सोयीचे वाटते.

अवैध कनेक्शनचा प्रश्न वर्षानुवर्षे लोंबकळत आहेत. शेतकऱ्याने स्वतः पोल व वायर आणून नवीन कनेक्शन घेतलेले आहे. काहींचे आकडे वर्षानुवर्षे चालू आहेत. याबाबत महावितरणचे अधिकारी ज्ञात आहेत परंतु हे कनेक्शन बंद केले जात नाही. जे शेतकरी याविषयी तक्रार करतील त्यांची नावे संबंधितांना सांगून शेतकऱ्यांत वाद निर्माण केले जातात. डिपॉझिट भरूनही अधिकृत कनेक्शन मिळत नसल्याने अवैध मार्गाचा अवलंब करीत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून विचार करणे गरजेचे आहे. त्यांच्या अधिकृत लोड शिल्लक नसेल तर शेतकरी त्यासाठी थांबायला तयार नाहीत आणि त्यांची कनेक्शन देखील बिनबोभाट चालू आहेत. अनधिकृत कनेक्शनबाबत तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या, असा अनाहूत सल्ला महावितरणचे अधिकारी तक्रारदार शेतकऱ्यांना देत असतात. त्यामुळे अनधिकृत कनेक्शन बंद करणे ही कुणाची जबाबदारी आहे याचा शोध घेणे आवश्यक झाले आहे.

एका ट्रान्सफॉर्मरवरील काही शेतकऱ्यांना सायफनच्या जाळ्याद्वारे पाणी भरणे सोपे होते. त्यामुळे तोही काळजी करताना दिसत नाही. एकच कनेक्शनधारक असलेला शेतकरी शेजारी दुसऱ्या ट्रान्सफार्मरची लाईन गेलेली नाही तो फक्त अडचणीत सापडलेला आहे. शेतकरी आणि महावितरणचे अधिकारी यांच्यात सामंजस्य असणे केव्हाही दोन्ही बाजूला फायद्याचे आहे; परंतु महावितरणचे अधिकारी त्यांच्या विशिष्ट दृष्टिकोनातून शेतकऱ्यांकडे बघत असतात.

शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकल्या जात नाही. ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर शेतकरी लोकवर्गणीतून दुरुस्ती करतात. चांगल्या दाबाने पूर्णवेळ वीजपुरवठा झाला तर शेतकरी बिले भरावयास एका पायावर तयार आहेत. तर महावितरणही अडचणीत येणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com