गटार योजनेला अजब कारभाराचे भुयार!

संजय झिंजे । ५ फुट व्यासाचे पाईप टाकण्याची मागणी
गटार योजनेला अजब कारभाराचे भुयार!

अहमदनगर | प्रतिनिधी

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या चौपाटी कारंजा ते रामचंद्र खुंट या चितळे रोड परिसरात सध्या भुयारी गटार योजनेचे पाईप टाकण्याचे काम चालू आहे. मात्र, लोकसंख्येचा विचार न करता कमी व्यासाचे पाईप वापरले जात आहेत.

महापालिकेचा हा अजब कारभार अनाकलनीय आहे. या ठिकाणी किमान ५ फूट व्यासाचे पाईप वापरावेत, अशी मागणी भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. चितळे रोडवर सुरू असलेल्या भुयार गटार योजनेच्या पाईपलाईनवर झिंजे यांनी सडकून टिका केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.

त्यात म्हटले आहे की, सध्या आपली मनपा नक्की काय करते याचा विचार नगरकरांना पडला आहे. कारण चौपाटी कारंजा हे मुख्य बाजारपेठेचे तोंड आहे. तेथून पुढे चितळे रोड, नेता सुभाष चौक, नवीपेठ, तेलीखुंट, कापड बाजार, दाळ मंडई या ठिकाणी जाता येते. तसेच हा सर्व परिसर मुख्य बाजारपेठेचा आहे. त्यामुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो. सध्या चौपाटी कारंजा येथून रोड बंद करून पाईप लाईन टाकण्याचे काम चालू आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून पाईपलाईन टाकण्याचे काम फक्त २०० ते ३०० फूटच झालेले आहे. त्यामुळे सर्व बाजारपेठ विस्कळीत झालेली आहे. येथे कोठेही काम चालू असल्याबाबतचे पाटी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे ट्रफिकची खप मोठी समस्या निर्माण होते, असेही झिंजे यांनी निवेदनात म्हटले आहे.

तेव्हा ३ फूट अन् आता दीड फूट...!

भुयारी गटारीचे चालू असलेले काम पाहिल्यानंतर माजी नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांची आठवण झाली. ३५ वर्षांपूर्वी बार्शीकरांनी ड्रेनेज पाईपलाईनच्या कामाची सुरुवात केली. त्या वेळी शहराच्या ४०-५० हजारांच्या लोकसंख्येनुसार ३ फुटांची ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आली होती. आता ही लोकसंख्या ४ लाखांपार असूनही चितळे रोडवर केवळ दीड फूट व्यासाची पाईपलाईन वापरली जात आहे. ते अत्यंत चुकीचे आहे.. पुढील २०-२५ वर्षांचे नियोजन करून कमीत कमी ५ फूट व्यासाची पाईलाईन वापरण्याची गरज असल्याचे झिंजे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com