एसटीपी प्लांटची जागा बदलण्यासाठी संगमनेरातील मुस्लिम बांधव आक्रमक

संगमनेर ते मंत्रालय पदयात्रा काढणार
एसटीपी प्लांटची जागा बदलण्यासाठी संगमनेरातील मुस्लिम बांधव आक्रमक

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर नगर परिषदेच्यावतीने शहरातील जोर्वे नाका परिसरात बांधण्यात येणार्‍या एस.टी.पी. प्लांटची जागा बदलण्यासाठी मुस्लिम बांधवांनी आता आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. बेमुदत साखळी उपोषण व मूक मोर्चा या आंदोलनानंतर मुस्लिम बांधव आता 31 जुलै रोजी थेट संगमनेर ते मंत्रालय अशी पदयात्रा काढून एस.टी.पी प्लांट बाबत मंत्रालयात आपली भूमिका मांडणार आहेत.

संगमनेर नगर परिषदेच्यावतीने जोर्वे नाका परिसरातील मोकळ्या जागेमध्ये मलनिसारण प्रकल्प (एस.टी.पी. प्लांट) बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवातही करण्यात आलेली आहे . या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त करून हा नियोजित प्रकल्प अन्य जागेत सुरू करावा, अशी मागणी परिसरातील रहेमतनगर, डाकेमळा, डोंगरेमळा, एकतानगर, जोर्वेनाका, लखमीपुरा, नाईकवाडपुरा, उम्मतनगर, देवीगल्ली, मोगलपुरा भागातील नागरिकांची आहे.

हा प्रकल्प येथे होऊ नये या मागणीसाठी या नागरिकांनी धरणे आंदोलन केले होते. दि. 25 ऑगस्ट रोजी तत्कालीन मुख्याधिकारी यांना निवेदनही दिले होते. याबाबत दि.27 मे रोजी प्रांताधिकारी कार्यालयात बैठकही घेण्यात आली होती. बैठकीमध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने नागरिकांच्या भावना, मागण्या समजावून घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठिय्या आंदोलन देखील केले होते. या आंदोलनानंतर परिसरातील नागरिकांनी बेमुदत साखळी उपोषण केले.

तब्बल 32 दिवस साखळी उपोषण करूनही प्रशासनाने या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या मुस्लिम बांधवांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. प्रशासनाकडून याबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याने मुस्लिम बांधवांनी हा प्रश्न थेट मंत्रालयात नेण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी दि. 31 जुलै रोजी संगमनेर ते मंत्रालय अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. एस.टी.पी. प्लांट स्थलांतर कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांनी याची तयारी सुरू केली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नगरपालिकेला साडेपाच कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. हा प्रकल्प मुदतीत न उभारल्यास दर महिन्याला तीस लाख रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावला आहे, एस.टी.पी प्लांट बाबत गैरसमज करून घेऊ नका असे आवाहन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले होते. मात्र त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता परिसरातील नागरिकांनी आता थेट मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एस.टी.पी प्लांट स्थलांतर कृती समितीच्या वतीने रस्त्यावरील आंदोलनाबरोबरच न्यायालयीन लढाईची तयारी सुरू केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com