वादळी पावसाने चांदा परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान

वादळी पावसाने चांदा परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा-बर्‍हाणपूर परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिके आडवी झाली आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे कृषी विभागाने करून शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

मागील आठवड्यापासून चांदा, बर्‍हाणपूर, कौठा, देडगाव, फत्तेपूर, रस्तापूर, माका, महालक्ष्मीहिवरे, म्हाळसपिंपळगाव परीसरात सततच्या रिमझीम पावसाने खरीप पिकांची पुरती वाट लावली. नगदी पीक असलेल्या कापूस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. कपाशी पिकांचे पन्नास टक्के नुकसान गत आठवड्यातच झाले होते. मात्र गेली दोन तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा रंग बदलला आहे. रिमझीम पाऊस आता मुसळधार बरसू लागला असून रोज सायंकाळी पाऊस चालू होतो.

चांद्याची कौतुकी नदीही आता चांगलीच वाहती झाली आहे. मात्र मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास या परिसरात वादळी पाऊस झाला. विजांचा कडकडाट प्रचंड होता. तर पावसाबरोबर सोसाट्याचा वारा असल्याने उभी पिके आडवी झाली. ऊस कपाशीचे मोठ्या प्रमाणात वादळाने नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे पडली. वादळी पाऊस सुरू होताच चांदा, बर्‍हाणपूरचा वीजपुरवठा खंडित झाला होता तो आजही सायंकाळपर्यंत पूर्ववत झाला नव्हता.

रिमझीम पावसाने कपाशीची तळाची आधीच बोंडे सडली होती तर दोन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसाने उरलीसुरली कपाशीही गेली असल्याने बळीराजाचे यंदा मोठे नुकसान झाले आहे. सणासुदीच्या काळात बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून आता पीककर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न बळीराजापुढे उभा ठाकला आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून बळीराजाला मदतीचा आधार द्यावा,अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.