वादळाचा महावितरणाला दणका

वीज गायब झाल्याने नगरकर हैराण
वादळाचा महावितरणाला दणका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महावितरण शहर आणि ग्रामीण विभागाला शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी वार्‍यासह गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. यामुळे शनिवारी रात्री गायब झालेली विज नगर शहरात रविवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरळीत झाली नव्हती. वादळी पावसाचा महावितरणला चांगलाच दणका बसला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे वीज वितरणकडून सांगण्यात आले.

शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात नगरशहरात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या बंद पडल्या होत्या. वीज लाईनवर झाडे पडली, कंडक्टर तुटले व जम्प गेले. (उच्च दाब पोल 2 नग व तसेच लघुदाब पोल 9 नग), तसेच ग्रामीण उपविभाग व पारनेर तालुका अंतर्गत काही 11 केवी उच्च दाब वाहिन्या नादुरुस्त झाल्या होत्या. नगर शहराच्या मानाने ग्रामीण भागात वादळाची तीव्रता कमी असल्याने कमी नुकसान होवून वीजपुरवठा सुरळीत होता.

मात्र नगरच्या शहरी भागात वसंत टेकडी, पारिजात नगर, जिल्हा रुग्णालय परिसर, बालिकाश्रम, गुलमोहर रोड, सावेडी, 33 केवी रामदास, 33 केवी एलएनटी, 11 केवी, निर्मलनगर, 11 केवी वडगाव, 11 केवी बोल्हेगाव, केडगाव, गंजबाजार पोस्ट ऑफिस बुरडगाव गावठाण, भोसले आखाडा, गोवेरमेन्ट पॉलीटेक्निक, शिवनेरी चौक, महादेव मळा, आंबेडकर रोड, लीना पार्क, करांडे मळा, दरेवाडी गावठाण, जामखेड रोड, दिल्लीगेट, शिवाजीनगर, गायके मळा, मानकर गल्ली, हुडको, सिद्धार्थनगर, मुकुंदनगर, यशवंत कॉलनी, फकीरवाडा इत्यादी भागांचा वीज पुरावठा रात्री खंडित झाला होता.

दरम्यान महावितरण कर्मचार्‍यांनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले, अंधार असल्याने व नुकसान मोठे असल्याने दुरुस्तीमध्ये अडथळे येत होते. रविवारी पहाटे तीन चार वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम सुरू होते. काल दुपारी 12 वाजेपर्यंत बंद असलेल्या भागातील 90 टक्के भाग सुरळीत करण्यात आला असून उर्वरित भाग सुरू करण्यासाठी प्रभारी अधीक्षक अभियंता कैलास जमदाडे तथा शहर विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक लहामगे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंते व जनमित्र कार्यरत होते. शनिवारच्या पावसात नगर शहरात सुमारे 6 ते 7 लाख रुपयांचे महावितरणचे नुकसान झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com