साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेऊन नागरिकांना 4 दिवसाआड पाणी द्या

ना. आशुतोष काळेंच्या नगरपरिषदेला सूचना
आ. आशुतोष काळे
आ. आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

पाटबंधारे विभागाशी झालेल्या चर्चेनुसार गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्या व नागरिकांना 4 दिवसाआड पाणी द्या, अशा सूचना साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.

कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून कोपरगाव शहरातील नागरिकांना यापूर्वी आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात होता. मात्र जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस तसेच धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे सर्व धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. सद्यस्थितीत पाऊस देखील सुरूच असून धरणात नवीन पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात येत होते.

मात्र कालव्यांना पाणी सोडण्यात आलेले नव्हते. गोदावरी कालव्यांवर अनेक पाणीपुरवठा योजना अवलंबून असून कोपरगाव शहरासह मतदार संघातील अनेक गावांच्या गावतळ्यात पाणी भरून घेणे आवश्यक होते. त्यामुळे गोदावरी कालव्यांना पिण्यासाठी पाणी सोडावे याबाबत पाटबंधारे विभागाशी चर्चा केली होती. त्याचा विचार करून पाटबंधारे विभागाने गोदावरी कालव्यांना पाणी सोडले आहे.

या सुरू असलेल्या आवर्तनातून कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे सर्व साठवण तलाव भरून घ्यावेत. जोपर्यंत सर्व पाणीपुरवठा योजनांचे साठवण तलाव भरले जात नाहीत तोपर्यंत आवर्तन सुरूच राहणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटींची निविदा प्रसिद्ध झाली असून हे काम लवकरच सुरू होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यांनतर शहरातील सर्व नागरिकांना नियमित पाणी मिळणार आहे. तोपर्यंत कोपरगाव नगरपरिषदेने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे.

- ना. आशुतोष काळे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com