खडी क्रशर बंदचा विकास कामांवर परिणाम

कर्जत तालुक्यात प्रशासनाच्या निर्णयाचा फटका
File Photo
File Photo

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

मागील काही दिवसांपासून कर्जत तालुक्यातील सर्व खडी क्रशर केंद्र हे महसूल विभागाने बंद ठेवले आहेत. मात्र खडी क्रशर बंद राहिल्यामुळे कर्जत तालुक्यातील विकास कामांवर याचा गंभीर परिणाम झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये निधी आल्यामुळे रस्ते, बंधारे, शासकीय कार्यालय याची कामे सुरू आहेत. मात्र क्रशर केंद्र बंद ठेवल्यामुळे या कामासाठी ठेकेदारांना आता खडी मिळत नाही. यामुळे अनेक कामे बंद झाली असून उर्वरित काही दिवसांत सर्व कामे बंद राहणार आहेत.

विकास कामांच्या प्रमाणेच कर्जत शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी नागरिकांची घरांची बांधकामे सुरू आहेत. या सर्व बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये खडीचा वापर करण्यात येत आहे. नागरिक वाळू मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे किंवा वाळू महाग असल्यामुळे खडीला प्राधान्य देत आहेत.

मात्र, सर्व क्रशर बंद असल्यामुळे खाजगी नागरिकांना आता खडी मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी व्यक्तींची बांधकामे बंद पडली आहेत. यामुळे बांधकामाशी संबंधीत कामगार, त्याचप्रमाणे क्रेशर केंद्रावर काम करणारे कामगारही बेरोजगार होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे सर्व गरीब असून त्यांच्या देखील उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्जतवरच अन्याय का ?

जिल्ह्यामध्ये सर्वत्र महसूल विभागाच्या आशीर्वादाने शेकडो संख्येने बेकायदेशीर खडी क्रशर केंद्र सुरू असल्याची चित्र पहावयास मिळत आहेत. असे असताना कर्जत तालुक्यातीलच सर्व खडी क्रशर केंद्र महसूल विभागाने बंद का ठेवली आहेत,याविषयी तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे.या खडी क्रशर चालकांकडून महसूल प्रशासनाला दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com