नगरमधून चोरलेल्या डंपरची नांदेडमध्ये विल्हेवाट

नगरमधून चोरलेल्या डंपरची नांदेडमध्ये विल्हेवाट

नगर तालुका पोलिसांची कारवाई || दोघांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहर व तालुक्यातून चोरलेल्या वाहनाची नांदेडमध्ये एका भंगार दुकानात विल्हेवाट लावली जात असताना नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांच्या पथकाने त्या दुकानावर छापा टाकला. बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथून चोरलेल्या डंपरची विल्हेवाट लावताना दोघांना पकडले आहे.

अख्तरखा ताहेरखा पठाण (वय 55 रा. पीर बुर्‍हाणनगर, नांदेड), गजानन संभाजी भोसले (वय 33 रा. सुहागण ता. पुर्णा, जि. परभणी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. बाबुर्डी घुमट येथील ज्ञानेश्वर बाळू कुंजीर यांनी त्यांच्या मालकीचा डंपर (एमएच 16 क्यू 7978) 30 सप्टेंबर रोजी नगर-दौंड रस्त्यावरील अरणगाव बायपास चौकाजवळील इसार पेट्रोल पंपाजवळ पार्क केला होता. सदरचा डंपर 30 सप्टेंबर रोजी रात्री चोरीला गेला होता. याप्रकरणी कुंजीर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार कमलेश पाथरूट, सुभाष थोरात, संभाजी बोराटे, सागर मिसाळ यांच्या पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगावपर्यंत डंपरचा माग काढला. परंतु, चोरट्यांनी डंपरला असलेल्या जीपीएस काढून टाकल्याने पुढे तपास करणे अवघड होऊन बसले. तरीही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे डंपर नांदेडपर्यंत गेल्याची माहिती काढली. नांदेड पोलिसांच्या मदतीने नगर तालुका पोलीस डंपरची तोडफोड सुरू असलेल्या दुकानापर्यंत पोहचले. तेथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com