स्थायीच्या बैठकीत नगरसेवकांच्या निधीला मंजुरी

स्थायीच्या बैठकीत नगरसेवकांच्या निधीला मंजुरी

महानगरपालिका : कोव्हिड सेंटर बंद करण्याच्या निर्णयासह विरोध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाग्रस्तांची संख्या घटल्याचे सांगत महापालिकेने सुरू असलेले कोव्हिड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला.

त्याला स्थायी समितीच्या सभेत विरोध दर्शवित जबाबदारी झटकून चालणार नाही, अशी भूमिका नगरसेवक गणेश भोसले यांनी मांडली.

सभापती मनोज कोतकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच स्थायी समितीची ऑनलाईन सभा झाली. शहरातील करोनाग्रस्तांची संख्या वाढत गेल्याने महापालिकेने आनंद लॉन्स, केडगाव, तंत्रनिकेतन, नटराज हॉटेल आणि जैन पितळे होस्टेलमध्ये कोव्हिड सेंटर सुरू केले.

याशिवाय बूथ हॉस्पिटललाही अर्थसहाय्य केले जाते. आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी बाधितांची संख्या घटल्याने ते बंद करण्याचा विषय सभेत मांडला. त्याला भोसले यांनी आक्षेप घेतला. महापालिकेला जबाबदारी झटकून चालणार नाही. संयुक्त विद्यमाने सुरू असलेले नटराज, जैन पितळेमधील कोव्हिड सेंटर बंद करावीत.

तंत्रनिकेतनमधील सेंटरमध्ये ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आणून तेथे चांगल्या सुविधा निर्माण करण्याची सूचना केली. दरम्यान, नगरसेवकांना विद्युत साहित्य खरेदीचा विषय सभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला आता दिवाबत्तीसाठी एक लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यातून बंद पडलेले स्ट्रीट लाईट सुरू होण्यासोबतच नव्यानेही बसविले जाणार आहेत.

स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेनेने बहिष्कार टाकत सारे काही आलबेल नसल्याचे संकेत दिले. स्थायी समितीच्या सभापतिपदी कोतकर निवडून आले. महापालिकेत ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले असले तरी सभापती होण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे त्यांचा पक्ष कोणता, यावर खल होत आहे. भाजपने नोटीस पाठवून पक्षीय कार्यवाही पूर्ण केल्याचे दाखविले. कोतकर यांनी आपला पक्ष कोणता हे सांगणे टाळले आहे. राष्ट्रवादी म्हणते ते आमचे, तर भाजप म्हणते ते आमचेच आहेत. कोतकर यांच्या निवडीनंतर महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र आली असल्याचे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर केले. मात्र, बहिष्कार नाट्यामुळे सर्व काही ठिक नसल्याचे दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com