स्टील विक्रीचा काळाबाजार

दीड कोटीचा माल जप्त || आयजींच्या पथकाची कारवाई
स्टील विक्रीचा काळाबाजार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्टीलची वाहतूक करणार्‍या वाहनांमधून स्टीलची चोरी करून ते काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाने नगर-औरंगाबाद महामार्गावर दोन ठिकाणी छापेमारी करून तब्बल दीड कोटी रूपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी रविवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 14 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पथकातील पोलीस अंमलदार प्रमोद सोनू मंडलीक व शकील अहमद शेख यांनी दोन स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत. स्टिलच्या (आसारी) मालकांचा विश्वासघात करून जालना येथून पुणे येथे वाहतूक करण्यासाठी दिलेल्या स्टीलची काळ्याबाजारात विक्री करणारे वाहन चालक, हेल्पर तसेच चोरून विक्री होत असल्याचे माहिती असतानाही हे स्टील खरेदी करून काळ्याबाजारात विक्रीसाठी साठवणूक करणार्‍या अशा 14 जणांविरूद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच दिवसांपूर्वी सुपा पोलीस ठाणे हद्दीत विशेष पथकाने छापा टाकून अशी कारवाई केली होती. यानंतर पथकाने शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान पांढरीपूल परिसरात दुसरी मोठी कारवाई केली. पहिली कारवाई नगर-औरंगाबाद महामार्गालगत हॉटेल निलकमल शेजारी असलेल्या पत्र्यांच्या कंपाऊंडमधील मोकळ्या जागेत करण्यात आली. तेथे राजसिंगानिया राजेश्वर सिंगानिया (वय 42), राहुलकुमार कोलई राव (वय 29), राजेश राव रामफेर (वय 34, तिघे रा. उत्तर प्रदेश, हल्ली मुकाम हॉटेल निलकमल शेजारी) हे रामभाऊ सानप (मूळ रा. पाटोदा, जि. बीड, सध्या रा. नगर) याच्या सांगण्यावरून नगर-औरंगाबाद महामार्गावरून जाणार्‍या स्टील (असारी) वाहतूक करणार्‍या वाहन चालकांशी संगनमत करत होते.

त्यांनी ट्रेलर (एनएल 01 के 7022) वरील चालक व हेल्पर प्रमोद छबू भांगर (वय 22 रा. भावाळा ता. पाटोदा जि. बीड), संदीप मोहन सांगळे (वय 27 रायाळ ता. पाटोदा जि. बीड) यांच्यासह इतर वाहन चालकांशी संगनमत करून स्टील वाहतूक करणारी वाहने पत्र्याच्या कंपाऊंडमध्ये नेवून स्टिलची चोरी करतांना व ते काळ्या बाजारात विक्री करण्याचे उद्देशाने साठवण करून ठेवले होते. पथकाने छापा टाकून 37 लाख 73 हजार 116 रूपये किंंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

दुसरी कारवाई खोसपुरी शिवारात नगर- औरंगाबाद महामार्गावर हॉटेल संग्राम पॅलेस शेजारी असलेल्या पत्र्याच्या कंपाऊंडमधील मोकळ्या जागेत करण्यात आली. मूळ मालक आदिनाथ रावसाहेब आव्हाड (वय 36 रा. पांगरमल ता. नगर) याच्या सांगण्यावरून कामगार ऋषिकेश रामकिसन वाघ (वय 22 रा. वाघवाडी ता. नेवासा), चेतन राजेंद्र हरपुडे (वय 22), शिवाजी नामदेव कुर्‍हाटे (वय 30), गोरक्षनाथ आसाराम सावंत (वय 28, तिघे रा. शिंगवे तुकाई ता. नेवासा) यांनी स्टिल (असारी) वाहतूक करणार्‍या वाहनांचे (एमएच 21 बीएच 4864 व एमएच 12 एसएक्स 9899) चालक व हेल्पर तात्याराव अशोक सपरे (वय 35) परशुराम अशोक सपरे (वय 25, दोघे रा. महाकाळा ता. अंबड, जि. जालना), शैलेश ज्ञानोबा तांदळे (वय 24 रा. हिंगणी जि. बीड) यांच्यासह इतर वाहन चालकांशी संगनमत करून स्टिलची चोरी करताना व ते काळ्या बाजारात विक्री करण्याचे उद्देशाने साठवणूक करून ठेवली असताना आढळून आले. या ठिकाणी पथकाने एक कोटी 10 लाख 88 हजार 929 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com