महाराष्ट्रातील अडीच हजार महिलांना फसवून ओमान, दुबईत नेले

चाकणकर यांची माहिती || सोडवण्याचे प्रयत्न सुरू
महाराष्ट्रातील अडीच हजार महिलांना फसवून ओमान, दुबईत नेले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्रातील अडीच ते पावणे तीन हजारांवर महिला ओमान व दुबईमध्ये अडकल्या आहेत. त्यांना फसवून तेथे नेले असून, त्यांच्या जवळील कागदपत्रे व मोबाईलही काढून घेतले असल्याने या महिलांचे लोकेशन मिळत नाही. मात्र, या महिलांना सोडवण्याचे प्रयत्न देशाचे परराष्ट्र खाते व त्या देशांतील भारतीय दुतावासाच्या मदतीने सुरू असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी येथे दिली.

दहा दिवसांपूर्वी तेथून एक महिला स्वतःची कशीबशी सुटका करून भारतात आल्यावर तिने तिच्यावरील आपबिती मला सांगितल्यावर तिच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे व तपास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या अन्य महिलांच्या सुटकेला प्राधान्यक्रम असल्याचेही चाकणकर यांनी सांगितले.

राज्य महिला आयोग आपल्या दारी...उपक्रमानिमित्त अध्यक्षा रुपाली चाकणकर नगरला आल्या होत्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी महिलांच्या तक्रारींवर जनसुनावणी घेतली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ओमान व दुबईमधील महिलांविषयी माहिती देताना चाकणकर म्हणाल्या, करोना काळात अनेक घरात कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने त्या घरातील महिला व मुलींसमोर उपजीविकेचा प्रश्न होता. त्यावेळी ओमान व दुबईमधील कुटुंबात घरगुती कामासाठी एजंटमार्फत अनेकजणी तिकडे गेल्या.

मात्र, त्यांना फसवून तिकडे नेले गेले होते. तेथे एअरपोर्टवर पोहोचल्यावर या महिलांकडील कागदपत्रे व मोबाईल काढून घेण्यात आले. त्यामुळे त्यांचे लोकेशन मिळत नाही. मध्यंतरी यापैकी काही महिलांनी त्यांचे व्हीडीओ पाठवले होते, त्यावरून लोकेशन काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेथून सुटका करवून घेऊन आलेल्या महिलेने तिच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितल्यावर तिला पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले व मुंबई पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ओमान व दुबईतील भारतीय दुतावास तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाद्वारेही तेथे अडकलेल्या अन्य महिलांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातून ज्या एजंटमार्फत त्या तिकडे गेल्या, त्या एजंटांचाही शोध पोलिसांनी सुरू केला आहे, अशी माहितीही चाकणकर यांनी दिली.

हिरकणी कक्ष व ड्रॉप बॉक्स

नगर जिल्ह्यातील मनपा व नगर पालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हिरकणी कक्ष व महिलांना स्वतःची ओळख न देता तक्रार करण्यासाठीचे ड्रॉप बॉक्स (तक्रार पेटी) बसवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या असून, येत्या 15 दिवसांत त्याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे, असे स्पष्ट करून चाकणकर म्हणाल्या, शाळा-महाविद्यालये तसेच बसस्थानकांवरील महिलांसाठीची स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत, तेथे पाण्याची पुरेशी सोय असावी, सॅनेटरी नॅपकीन सुुविधेसह अन्य आवश्यक सुविधांबाबतच्या त्रुटीही 15 दिवसांत दूर करण्याचे सांगितले आहे. बालविवाह रोखण्यासाठी संबंधित दोन्ही कुटुंबातील सदस्य, गुरुजी व अन्य नातेवाईकांसह गावांचे सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करून लोकप्रतिनिधींवर जबाबदारी निश्चित होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी जिल्ह्याची आकडेवारी सांगताना माहिती दिली की, जिल्ह्यात 36 बालविवाहाचे प्रयत्न झाले. त्यापैकी 33 रोखण्यात यश आले व तीन प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. सोनोग्राफी सेंटर्स 283 असून त्यापैकी 63 बंद आहेत. मिशन वात्सल्य योजनेंतर्गत 3 हजार 998 लाभार्थ्यांना व मनोधैर्य योजनेचा 58 लाभार्थ्यांना लाभ दिला गेला आहे. नगरला झालेल्या आयोगाच्या जनसुनावणीत 152 तक्रारी आल्या आहेत. यात कौटुंबीक हिंसाचार, हुंडाबळी, बालविवाह, प्रॉपर्टी वाद वअन्य प्रकरणांचा समावेश आहे. यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे जाणून घेऊन आयोग निकाल देणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नृत्यांगना गौतमी पाटील व्हीडीओ प्रकरणी बोलताना, चेंजींग रुममध्ये महिला कपडे बदलत असताना त्याचे व्हीडीओकरणे गुन्हा असून, यावर प्रभावी कारवाई कृती कार्यक्रम राबवण्याचे आदेश सायबर सुरक्षा विभागाला दिले असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

कोपरगाव तहसीलदारांवर खोटा गुन्हा

कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांच्या बाजूने महिलांच्या तीन-चार गटांनी राज्य महिला आयोगाकडे भूमिका मांडली आहे व विरुद्ध बाजूबद्दल तक्रारीही दाखल केल्या आहेत. संबंधित अधिकारी चांगले असून त्यांचे कामही चांगले आहे.त्यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे या गटांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणी सुनावणी करताना दोन्ही बाजू ऐकून व जिल्हा प्रशासनाकडून सर्व आढावा घेऊन राज्य महिला आयोग निर्णय करेल, असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com