राज्यात युरिया खताचा तुटवडा
सार्वमत

राज्यात युरिया खताचा तुटवडा

संगमनेरात शेतकी संघाच्या प्रयत्नाने शेतकर्‍यांना दिलासा

Arvind Arkhade

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

राज्यात व देशात आलेल्या करोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला होता. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाल्याने संपूर्ण राज्यामध्ये युरिया व रासायनिक खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या तुलनेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून शेतकी संघाच्या वतीने शेतकर्‍यांना युरियाचे दररोज एक हजार गोण्यांचे वाटप शेतकर्‍यांना केले गेले.

संगमनेर तालुका हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने दरवर्षी पाच लाख मेट्रिक टन युरिया खताची आवश्यकता तालुक्यासाठी असते. याचे नियोजन मागील अनेक वर्षांपासून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च महिन्यापासूनच करण्यात येत असते. त्यामुळे दरवर्षी राज्यात कशीही परिस्थिती असली तरी संगमनेरकरांना मात्र वेळेवर युरियासह रासायनिक खते उपलब्ध होतात. शेतकी संघाच्या मार्फत विविध सोसायट्यांमधून शेतकर्‍यांना हे खत पुरविले जाते. शेतकी संघाकडून तीन लाख मेट्रिक टनाचे वाटप गेली अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.

या वर्षी मात्र देशात व राज्यात आलेल्या करोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आणि मार्च ते जुलै पर्यंतच्या काळात युरिया मिळण्यास विलंब झाला. सध्या शेतकर्‍यांची युरियासाठी मागणी मोठी असून त्या प्रमाणात खतांचा पुरवठा होत नाही. युरिया व रासायनिक खते निर्मिती व वितरण व्यवस्था ही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असल्याने त्यांच्याकडूनही महाराष्ट्राला पुरेसा खत पुरवठा होऊ शकला नाही.

राज्यात युरियाचा प्रचंड तुटवडा असताना नामदार बाळासाहेब थोरात यांनी मात्र संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी विशेष प्रयत्न करून काही प्रमाणात युरिया खत मिळविले. संगमनेर शेतकी संघ हा शेतकर्‍यांचा हक्काचे ठिकाण असल्याने या मार्फत शेतकर्‍यांना वितरण व्यवस्था करण्यात येत आहे.

शेतकी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव थोरात, उपाध्यक्ष संपतराव डोंगरे, त्यांचे सर्व संचालक मंडळ व व्यवस्थापक अनिल थोरात यांच्या प्रयत्नातून दररोज एक हजार शेतकर्‍यांना व्यवस्थित लाईनमध्ये टोकन देऊन खत पुरवठा केला जात आहे. या सर्व काळामध्ये फिजिकल डिस्टंसिंगही पाळले जात आहे.

तुटवड्याच्या काळात प्रामाणिकपणे काम करणार्‍या शेती संघाकडून संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळत आहे. याकामी नामदार बाळासाहेब थोरात दररोज आढावा घेत असून जास्तीतजास्त शेतकर्‍यांना युरिया खत मिळावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे युरिया व इतर खतांची मागणी केली असून लवकर खतपुरवठा सुरळीत होईल असा विश्वासही शेतकी संघ व व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आला आहे.

देशासह राज्यात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. खतांचे उत्पादन व पुरवठा हे केंद्र सरकारच्या अधिकारात आहे. रासायनिक खतांच्या (युरिया) तुटवड्याबाबत राज्यातील शेतकरी हा मोठ्या अडचणीत आला आसल्याने आवश्यक तेवढा खत पुरवठा होण्यासाठी संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय रसायन व खतमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना आवश्यक तेवढा खत पुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसे निवेदन तहसीलदार अमोल निकम यांना देण्यात आले आहे. यावेळी संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाबा ओहोळ, नानासाहेब शिंदे, नितीन अभंग, अशोक हजारे, सुहास आहेर, तानाजी शिरतार उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com