राज्य ऊस नियंत्रण मंडळाचे अशासकीय सदस्यपदी 'यांची' नियुक्ती

राज्य ऊस नियंत्रण मंडळाचे अशासकीय सदस्यपदी 'यांची' नियुक्ती

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

राज्यातील सर्व साखर कारखानेनिहाय अंतिम ऊस दर ठरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 2013 ला कायदा अस्तित्वात आलेला असुन, त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या ऊस नियंत्रण मंडळाचे अशासकीय सदस्यपदी शेतकरी प्रतिनिधी म्हणून शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वैधानिक दर्जा असलेल्या या उच्चस्तरीय समितीमध्ये राज्यातील प्रमुख शेतकरी संघटनेचे तीन व शासन स्तरावर दोन असे एकूण पाच शेतकरी प्रतिनिधी, सहकारी साखर कारखान्याचे तीन व खाजगी साखर कारखान्याचे दोन असे एकूण पाच कारखाना प्रतिनिधी, सहकार व पणन मंत्रालयाचे अपर मुख्य सचिव, कृषी मंत्रालयाचे अपर मुख्य सचिव, अर्थ मंत्रालयाचे अपर मुख्य सचिव, सहकार आयुक्त व निबंधक आदी संबंधित शासन विभागाचे प्रतिनिधी सदस्य याप्रमाणे राज्य ऊस नियंत्रण मंडळाची रचना असून, साखर आयुक्त हे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून कामकाज पाहणार आहेत.

डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार उसापासून तयार होणार्‍या कारखान्यातील साखर व उपपदार्थ यापासून मिळणार्‍या महसुली उत्पन्नाच्या 70:30 सुत्रावर आधारित उसाच्या दराचे विनियमन अधिनियम 2013 व नियम 2016 मधील तरतुदीनुसार व राज्यपाल यांच्या मान्यतेने महाराष्ट्र शासनाने दि. 12 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार उपरोक्त ऊस नियंत्रण मंडळ गठित केले आहे.

ऊस दराबाबत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या या महत्वपूर्ण समितीच्या सदस्यपदी शेतकरी संघटनेचे अभ्यासु कार्यकर्ते बाळासाहेब पटारे यांची नियुक्ती झाल्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असुन,आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने ते शेतकर्‍यांना न्याय मिळवून देतील अश्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com