राज्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा
सार्वमत

राज्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा

Arvind Arkhade

संगमनेर|Sangmner

करोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असल्यामुळे 31 मे पर्यंत बदल्या करणे शक्य नसल्याने यावर्षीच्या बदल्या रद्द करण्यासंदर्भात सूचित करण्यात आले होते. तथापि यासंदर्भात राज्य शासनाने पुन्हा नव्याने आदेश देत 31 जुलैपर्यंत 15 टक्के कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या दरवर्षी बदली अधिनियमातील तरतुदीनुसार 31 मे पूर्वी करण्यात येत होत्या. तथापि यावर्षी करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे 31 मे ला बदल्या करण्यात आल्या नाहीत, तर यावर्षी त्या बदल्या होणार नाहीत असे सूचित करण्यात आले होते.त्यामुळे बदली इच्छुक अनेक कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले होते. तर ज्यांना बदल्या नको त्यांना आधार मिळाला होता.

राज्य शासनाने अखेर शासन निर्णय जारी करत बदल्या करण्याची मुदत वाढवून दिली आहे. त्यानुसार सर्व विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सुमारे पंधरा टक्के कर्मचार्‍यांच्या बदल्या होऊ शकणार आहेत. तसेच विशेष सर्वसाधारण बदल्यांसंदर्भात देखील विचार करण्यात येणार आहे. त्यासाठी मान्यता देणार्‍या वरिष्ठ कार्यालयाची अनुमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

31 जुलैपर्यंत बदल्या करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्धनाच्या बदल्यांचे काय होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने पाच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची अभ्यास समिती नेमून बदल्यांसंदर्भात धोरण घेण्यासाठी अहवाल देण्यास सांगितले होते. समितीने अहवाल सादर केला असला तरी त्यासंदर्भाने राज्य शासनाने कोणत्या स्वरूपाचा निर्णय घेतला आहे. हे अद्याप गुलदस्त्यात आहे. राज्यातील शिक्षक संघटनांनी बदल्यांबाबत सातत्याने नियमात बदल करण्याची मागणी केली होती यापूर्वी दोन-तीन वर्षे विविध संघटनांनी आंदोलने केली होती. मात्र त्याचा परिणाम झाला नव्हता. शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात नवीन शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असे ग्रामविकास मंत्र्यांनी अगोदर सूचित केले होते. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात राज्यभर मोठ्या प्रमाणावरती उत्सुकता आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांची बढती होण्याची शक्यता आहे.तर काही विभागांनी यासाठी ची कार्यवाही सुरू केली आहे. यासंदर्भात राज्य शासनाने प्राधिकृत अधिकार्‍यांना तसे आदेश दिले आहेत. ती कार्यवाही येत्या काही दिवसांत होणे अपेक्षित आहे. तथापि त्यापूर्वी विविध कर्मचारी व अधिकार्‍यांच्या बदल्या होणार असल्यामुळे भरती पात्र अधिकारी-कर्मचार्‍यांची गैरसोय होण्याची शक्यता अधिक आहे. काही प्रमाणात सोय देखील होऊ शकणार आहे. तथापि वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना स्व जिल्ह्यात नोकरीची संधी उपलब्ध असणार आहे. मात्र बदलीने सदरच्या जागा भरल्या गेल्यास अनेकांची गैरसोय होणार आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत नियुक्ती देण्यात आलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रतीक्षा अनेक अधिकार्‍यांना असते. त्यात सध्या बढती व नवनिर्मिती देत असताना विभागनिहाय रोटेशन पद्धतीने करण्यात येते. त्यामुळे सर्वात अगोदर विदर्भातील जागा भरण्यात येतात. त्यामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जे कर्मचारी, अधिकारी विदर्भात नोकरी करत आहेत ते पुन्हा आपल्या विभागात येण्यासाठी उत्सुक असतात. यावर्षी बदल्या झाल्या नसत्या तर त्यांना एक वर्ष त्या विभागात थांबावे लागले असते. शासनाने यावर्षी बदल्यांचा निर्णय घेतल्यामुळे तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या बदलीपात्र अधिकार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com