राज्यस्तरीय महाआवासमध्ये जामखेड पंचायत समिती द्वितीय स्थानावर

आमदार पवारांच्या नियोजनामुळे पिछाडीवर असणारा तालुका आता आघाडीवर
राज्यस्तरीय महाआवासमध्ये जामखेड पंचायत समिती द्वितीय स्थानावर

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

महाआवास अभियानांतर्गत जामखेडच्या पंचायत समितीने राज्य पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्हास्तरीय सर्वोतकृष्ट तालुका म्हणून 100 पैकी 75.20 गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

दरम्यान, विभागस्तरीय निवड झालेल्या जामखेड पंचायत समितीला आज (दि.30) विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. याअगोदरही ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना या दोन्ही योजनेचे व्दितीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच गुणात्मक प्रगती व्हावी या उद्देशाने नोव्हेंबर 2020 मध्ये राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून राज्यात 100 दिवसांचे महाआवास अभियान-ग्रामीण आयोजित करण्यात आले होते. या अभियानांतर्गत पंचायत समितीने रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण, शबरी आवास योजना अशा विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून सहा महिन्यांत 791 घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

दोन वर्षांपूर्वी जामखेड हे स्पर्धेत उतरले नव्हते. कर्जत जेव्हा स्पर्धेत उतरले तेव्हा कर्जतचा 52 वा क्रमांक आला होता आणि आता कर्जत 5 व्या क्रमांकाच्या स्थानावर आहे. यावेळेस ताकदीने स्पर्धेत उतरून नागरिकांना यामध्ये सहभागी करून पहिल्या पाच क्रमांकाच्या यादीत आलो पाहिजे असे सूक्ष्म नियोजन आखत आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा प्रभावीपणे राबवली.त्यामुळे गोरगरीब वंचित कुटुंबांना आपल्या हक्काचा निवारा मिळाला आहे. घरकुल योजनेचे प्रश्न सोडवण्यासाठी आ. पवार यांनी मुंबई येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख राजाराम दिघे यांच्यासह कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधीकारी अमोल जाधव, जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन प्रश्न मांडले.

ड यादीत नावे असलेल्या लाभार्त्यांची सर्वेक्षणात चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली नोंदणी, वाहने, टेलिफोन सारख्या सुविधांमुळेही अनेक कुटुंबांना अपात्र करण्यात आले होते. तसेच ज्यांना घरकुलसाठी जागा नाही अशांना यशवंत मुक्त वसाहतमध्ये समूहाने जागा मिळावी, तसेच वाढीव उद्दिष्टाबाबतही आ. रोहित पवार यांनी चर्चा केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com