पालखी मार्गावर राज्यशासन सुविधा निर्माण करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार : संत निळोबारायांच्या गाथांचे प्रकाशन
पालखी मार्गावर राज्यशासन सुविधा निर्माण करणार

पारनेर |प्रतिनिधी| Parner

महाराष्ट्राला मोठा आध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला असून प्रगल्भ महाराष्ट्र घडविण्याचे काम संतांनीच केले आहे. पालखी मार्गाचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. यात राज्य सरकारनेही आपला वाटा उचलला आहे .या मार्गावर वृक्षारोपण करणे, मुक्कामाच्या ठिकाणी सुविधा निर्माण करणे यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दरम्यान,पारनेर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी भरीव निधी देण्याची घोषणाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.

पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे निळोबाराय गाथाचे प्रकाशन तसेच गाथा वाड्याच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ ना. पवार यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार निलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते, निळोबाराय देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोकराव सावंत यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राज्यावर करोनाचे मोठे संकट आले असतानाही पालखी सोहळ्याची परंपरा खंडित होऊ दिली नाही. संताच्या भक्तिमार्गाच्या वाटेवरून चालत ही परंपरा जोपासण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. पारनेर शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना करीत पाणी योजनेसाठी आर्थिक निधीची तरतूद करण्याची ग्वाही दिली. तसेच पिंपळनेर येथील गाथा वाडयाचा जिर्णोद्धार व सभामंडपासाठी राज्य सरकारच्यावतीने 50 लाखांचा निधी जाहीर केला. करोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तटी करोना अजून गेलेला नाही. रशिया, चीन, युरोप या देशात पुन्हा तिसरी लाट आल्याचे सांगत करोनाविषयी हलगर्जीपणा न करता गांभीर्याने काळजी घेण्याची तसेच दोन्ही लसीकरण करून घेण्याची आवश्यकता असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

आमदार निलेश लंके यांनी कान्हूर पठार परिसरातील 16 गावे, राळेगण-सिद्धी परिसरातील 14 गावांची, जामगाव परिसरातील 6 गावांची पाणीपुरवठा योजना तसेच जातेगाव पुणेवाडी येथील उपसा जलसिंचन योजनेसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. ढवळपुरी परिसरात एमआयडीसी झाल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, असे सांगत या परिसरात एमआयडीसीला मंजुरी देण्याची मागणीही आमदार लंके यांनी केली.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, चैतन्य महाराज देगलूरकर, महंत भास्करगिरी महाराज यांची भाषणे झाली. प्रास्ताविक देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी केले .याप्रसंगी डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, आत्मा कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल झावरे,गोपाळकाका मकाशीर,उद्योजक सुरेशशेठ धुरपते, अशोक कटारिया,अशोक रोहोकले, राजेंद्र चौधरी, जितेश सरडे,विक्रमसिंह कळमकर आदी उपस्थित होते. सुभाष पठारे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com