
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने जिल्ह्यातील अवैध दारू, तसेच हातभट्टी विरोधात कारवाई करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. 22 ते 26 जुलै दरम्यान ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अधीक्षक पाटील यांनी दिली.
22 व 23 जुलै या दोन दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर दोन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण 26 गुन्हे नोंद करून 24 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईत 95 लीटर देशी दारू, 13 लीटर विदेशी दारू, 316 लीटर हातभट्टी, तीन हजार 985 लीटर रसायन, 85 लीटर ताडी असा एकूण एक लाख 75 हजार 306 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
24 जुलै रोजी श्रीरामपूर भरारी पथकाने कोल्हार घोटीरोड, इंदोरी फाटा येथील हॉटेल सह्याद्री, तसेच हॉटेल रूद्र, लहीत खु. (ता. अकोले) येथे दारूबंदी गुन्ह्याचे छापे मारून अवैध 330 लीटर देशीदारू तसेच सात लीटर विदेशी दारू असा एकूण एक लाख 32 हजसा 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे.
तसेच 26 जुलै रोजी श्रीरामपूर भरारी पथकाने झगडेफाटा चौफुली (ता. कोपरगाव) येथे दारूबंदी गुन्ह्याकामी छापा मारून चारचाकी वाहनातून अवैधरित्या देशी, विदेशी दारूसह एकूण पाच लाख 68 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर कारवाईत एका जणाला अटक करण्यात आलीआहे.