राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या पथकाकडून अवैध दारुविरोधी अकोल्यात धाडी

राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या पथकाकडून अवैध दारुविरोधी अकोल्यात धाडी

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील अवैध दारूच्या तक्रारींची दखल थेट गृहमंत्री, उत्पादन शुल्क आयुक्त यांनी घेऊन आयुक्तांनी नाशिक उत्पादन शुल्क अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पथक दोन दिवस अकोल्यात पाठवले. या पथकाने अकोले, राजूर, कोतूळ येथील अवैध दारुबाबत धाडी घातल्या व अकोले व राजूर येथे कारवाया केल्या आहेत व इथून पुढेही हे पथक सतत तालुक्यावर लक्ष ठेवून असेल व तक्रारींची दखल घेणार आहे.

लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबांत रोजगार नसल्याने दारूसाठी पुरुषवर्ग महिलांकडून पैसे हिसकावून घेऊन मारहाण करतो आहे. अशा काळात अवैध विक्री पूर्णपणे बंद असणे गरीब कुटुंबासाठी आवश्यक आहे असे पत्र आंदोलनाने गृहमंत्री व उत्पादन शुल्क आयुक्त यांना लिहिले होते.

अकोल्यातील डोंगरे यांच्या दुकानाबाहेर दारू विक्री करताना या पथकाने कारवाई केली व राजूर येथील अवैध विक्रीवर गुन्हा दाखल केला. या पथकातील नगर जिल्ह्यातील एका अधिकार्‍याने राजूर, कोतूळ येथे दारू विक्रेत्यांना सावध केल्याने कारवाईवर परिणाम झाला हे पुराव्यानिशी आंदोलनाने उत्पादन शुल्क आयुक्तांना लक्षात आणून दिले. आयुक्तांना राज्यस्तरावरून पथक पाठवावे लागते याचाच अर्थ संगमनेर येथील उत्पादन शुल्क कार्यालय अकार्यक्षम असल्याचे व अवैध दारूला पाठीशी घालत असल्याचे वास्तव पुढे येते आहे. येथील अधिकारी तातडीने बदलावेत अशी मागणी दारूबंदी आंदोलनाने केली आहे.

इतक्या कारवाया होऊनही पुन्हा कालपासून नदीपुलाजवळ चोरून विक्री सुरू झाली आहे. अकोले स्मशानभूमीत खुलेआम दारू विकली जात आहे. एकीकडे शोकाकूल नातेवाईक उभे असताना तिथे दारू विकणार्‍या या विक्रेत्यांना अकोल्याचे नवीन पोलीस निरीक्षक यांनी पायबंद घालावा व अकोले व राजूरमधील गेल्या 5 वर्षांतील झालेल्या कारवाया एकत्र करून त्याआधारे सतत तक्रारी येत असलेल्या दुकानांचे लायसन रद्द करावे व राजूरमध्ये तडीपारी करावी, अशी मागणी दारूबंदी आंदोलनाच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे, निलेश तळेकर, संतोष मुतडक, संदीप दराडे, दत्ता शेणकर, जालिंदर बोडके, डॉ. भाऊराव उघडे व हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com