राज्य नाट्य स्पर्धेचा बिगूल वाजला

15 नोव्हेंबरपासून सुरूवात
राज्य नाट्य स्पर्धेचा बिगूल वाजला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेचा बिगूल वाजला असून या स्पर्धा 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेसाठी नाट्य संस्थांनी 17 ते 15 सप्टेंबर या कालावधीत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

61 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. नगरची स्पर्धा माऊली संकुलात होणार आहे. 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी 1 जानेवारी 2023 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची स्पर्धेची प्राथमिक फेरी 1 जानेवारी 2023 पासून 10 केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असून दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी 2023 मध्ये आयाजित करण्यात येणार आहे.

राज्य नाट्य स्पर्धेकरीता 3000 रुपये इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष तर बालनाट्य स्पर्धेकरीता 1,000 रुपये इतक्या रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील. नगर जिल्ह्यातील संस्थांनी आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका 15 सप्टेंबरपर्यंत संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर सादर कराव्यात.

स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com