राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘परफेक्ट बायको कशी शोधावी?’

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘परफेक्ट बायको कशी शोधावी?’

संदीप जाधव | 9225320946

बदलत्या युगातील जीवनशैलीने मानवाच्या भावनांवरही कमालीचा परिणाम झाला आहे. जीवनात भावनांना मोठे महत्त्व आहे. कितीही तांत्रिक आणि यांत्रिक प्रगती झाली तरी माणसाला भावना व्यक्त करण्यासाठी आणि समजण्यााठी माणूसच गरजेचा ठरतो. मानव आणि यंत्र यांच्यातील संघर्ष नात्यांना दूर घेऊन चाललाय. हा धागा पकडून राज्य नाट्य स्पर्धेत सोमवारी सादर झालेल्या ‘परफेक्ट बायको कशी शोधावी’ या नाटकाने प्रेक्षकांचे फूल टू मनोरंजन तर केलेच, मात्र बदलत्या नात्यांवरील गंभीर सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकला.

संगमनेरच्या रंगकर्मी बहुउद्देशीय संस्थेने सादर केलेल्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन डॉ. अमित शिंदे यांनी केले. एक-दोन कलाकार वगळता उर्वरित सर्वच कलाकारांनी रंगमंचावर पहिल्यांदाच पाऊल ठेवले होते. कलाकारांच्या बहारदार सादरीकरणामुळे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

नाटकाच्या सुरुवातीलाच दोनजण पडद्याबाहेर येऊन नाटकाऐवजी व्याख्यान होणार असल्याचे सांगतात. त्यावर प्रेक्षकांतील काहीजण जाब विचारतात. यामुळ सर्वसामान्य प्रेक्षक काही काळ संभ्रमात पडतात. नंतर मात्र तो नाटकाचाच भाग असल्याचे लक्षात येते नि पडदा उघडला जातो. अनेक ब्रेकअप झालेल्या जीवन या विवाहेच्छूक तरुणाला परफेक्ट बायको हवी असते. हे समजल्याने एक संस्था त्याला यांत्रिक बायको देण्याचे ठरवते. प्रथम बिपाशा नावाची यांत्रिक बायको त्याला मिळते. मात्र, तिच्या सल्ल्यांच्या भडीमाराने त्रासलेला जीवन बायकोला अपडेट करण्याचे कंपनीच्या प्रतिनिधीला सांगतो.

मग जीवनला अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या वेषातील उषा मिळते. तिच्याही वागण्याला कंटाळून जातो. उषाला अपडेट केले जाते. मग येते ‘एकच प्याला‘ या गाजलेल्या नाटकात बालगंधर्वांनी पात्र केलेल्या सिंधू या पात्राची प्रतिकृती. मात्र, आपल्या भावना यांत्रिक बायकोला समजत नसल्याने जीवन हतबल होऊन होतो. मग शेवटी त्याला खर्‍या-खुर्‍या बायकोची गरज भासते. असे साधारण कथानक असलेल्या या नाटकात सध्या सर्वांनाच भेडसावत असलेल्या सामाजिक समस्येवर बोट ठेवले आहे. समाजाने स्त्रीला केवळ काम करणारे यंत्र न समजता माणूस म्हणून स्वीकारावे, असा संदेश नाटकातील स्त्री पात्रांनी स्वगतातून दिला. जीवन या पात्रानेही डिजिटल युगात दबलेल्या मानवी भावनांच्या समस्येवर प्रकाश टाकला.

लेखनाबरोबरच दिग्दर्शनाची जबाबदारी डॉ. अमित शिंदे यांनी सक्षमपणे उचलली. त्यांनी कलाकारांकडून चांगली तयारी करवून घेतली. आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिकांना पात्रांनी योग्य न्याय दिला. काही चुकाही झाल्या.

सूत्रधाराची छोटी भूमिका रामदास बालोडे यांनी केली. त्यांच्या एन्ट्रीने सर्वसामान्य प्रेक्षकांना गोंधळून टाकले. खरंच नाटक होणार की नाही याबाबत बालोडेंनी खराखुरा संभ्रम निर्माण केला.

नटी व जीवनच्या आईची भूमिका रंजना पवार यांनी छान रंगवली. त्यांच्या संवादातील गावरान बाजाला म्हणींची चांगली साथ मिळाली. आत्मविश्वासाने आईला रंगमंचावर आणलेल्या पवार यांचा अभिनय कसदार वाटला.

जीवन या मध्यवर्ती पात्राला डॉ. नवनाथ वाबळे यांनी झक्कास उभे केले. त्यांचे प्रसंगानुरूप बदलत जाणारे हावभाव छानच वाटले. सकारात्मक देहबोली असलेल्या डॉ. वाबळे यांचा हजरजबाबीपणाही पाहायला मिळाला. टीपॉयवर विसरलेले दोन मोबाईल आणि हात लागून चुकून पडलेल्या बाटल्या या दोन प्रसंग त्यांनी छानपणे सावरले!

मानसची भूमिका डॉ. अक्षय कर्पे यांनी केली. त्यांच्या अभिनयाला समर्पक हावभावांची साथ मिळाली. मात्र, एका प्रसंगात ते संवाद विसरले.

देव या भूमिकेला अंतून घोडके यांनी आणले. स्पष्ट आवाजातील त्यांचे संवाद छान वाटले.

बिपाशा या पात्राला वैष्णवी भोईर हिने रंगवले. मॉड यांत्रिक बायको तिने हुबेहूब उभी केली. तिच्या वेगवान संवादांनी प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या. यांत्रिक हालचालीही अप्रतिम. एक-दोनदा संवादात ती अडखळली असली तरी आपली भूमिका तिने चांगली केली.

नेहा या भूमिकेला मंजुषा बेनके हिने साकारले. मद्यधुंंद अवस्थेतीत तिच्या हालचाली नैसर्गिक वाटत होत्या.

उषा या पात्राला ज्ञानेश्वरी देशमुखने नववारीत रंगमंचावर आणले. संवादापेक्षा तिचा कायिक अभिनय जास्त भावला.

सर्वांत जास्त विनोद पिकविणार्‍या सिंधू या पात्राला डॉ. गायत्री पिंपरकर हिने छानपैकी सादर केले. बालगंधर्वांची कवनांचा आधार घेत साकारलेली भूमिका प्रेक्षकांना सर्वांत जास्त आवडली. तिचा आत्मविश्वास एकदाही डगमगला नाही.

नेपथ्याची जबाबदारी अमोल सांगळे यांच्याकडे होती. टेबलावरील रोबो डिजिटल युगाची साक्ष देत होता. दोन खुर्च्यांमधील वेगळेपण मात्र खटकले. पात्रांची वेशभूषा अंतून घोडके व वंदना बंदावणे यांनी केली होती. बिपाशा, उषा आणि सिंधू यांची वेषभूषा अप्रतिम होत्या.

संगीत संयोजनाची जबाबदारी डॉ. शिंदे यांनी उचलली. बायको अपडेशनच्या वेळचे संगीत अगदी समर्पक वाटले. जीवनला झाडूने धोपटत असताना फटक्यांचा आवाज मात्र मिसमॅच झाला. रंगमंच व्यवस्था अरुण शहरकर यांनी पाहिली.

प्रसंगांना परिणामकारक ठरणारी प्रकाश योजना सोहम बाफना यांनी दिली. एका प्रसंगात मात्र लाईट लावण्याची घाई झाली. रंगभूषा सोहम सुदर्शन सैंदाणे यांनी छानपैकी केली.

दमदार संहितेला दिग्दर्शकाने नवख्या कलाकारांच्या साथीने रंगमंचावर प्रभावीपणे सादर केले. काही चुकाही त्यांच्याकडून झाल्या. एका प्रसंगात जीवनची आई आणि उषा सोफ्यामागे बसून संवाद साधत होत्या. बसण्याची जागा चुकल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. योग्य पात्र निवड करण्यात दिग्दर्शक डॉ. अमित शिंदे व सहायक दिग्दर्शक अंतून घोडके यशस्वी झाले. पात्रांनीही दमदार अभिनय केला. अनेक प्रसंगांतून हास्याचे फवारे अन् एक गंभीर सामाजिक समस्या यांचा योग्य समन्वय साधत दिग्दर्शकाने नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खूष केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com