राज्य नाट्य स्पर्धा 2022 : मी पण नथूराम गोडसेच बोलतोय...

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : मी पण नथूराम गोडसेच बोलतोय...

संदीप जाधव | Ahmednagar

अहिंसावादाला जोपासणार्‍या महात्मा गांधींची हत्या करणार्‍या नथूराम गोडसेचे होत असलेले उदात्तीकरण चुकीचे असल्याचा, तसेच गांधींच्या हत्येस मनुवादच जबाबदार असल्याचा दावा करणारी नाट्यकृती राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्या प्रयोगात पाहावयास मिळाली.

नगरच्या स्वराज्य युवा प्रतिष्ठानने सादर केलेले व उल्हास नलावडे लिखित, दिग्दर्शित ‘मी पण नथूराम गोडसेच बोलतोय’ या दोन अंकी नाटकाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. शेवटच्या प्रसंगात काही प्रेक्षकांनी नाटकातील मुद्दा न पटल्याने गोंधळ घातला. मात्र, तरीही कलाकारांनी न डगमगता प्रयोग पूर्ण केला.

पडदा उघडताच नथूराम गोडसे आपली ओळख करून देतो. गांधींची हत्या केल्याचा पश्चात्ताप त्याला होतो. हत्या करण्याचा कट कसा रचला, हत्या कशी केली, त्यानंतर न्यायालयाने दिलेली शिक्षा, न्यायालयात भेटण्यास आलेला गांधीजींचा मुलगा देवीदास, माफीचा साक्षीदार झालेला दिगंबर बडगे आदी फ्लॅश बॅकमधील प्रसंग दाखविताना दिग्दर्शकाची कल्पकता प्रेक्षकांना भावली. ऐतिहासिक प्रसंगांत परिणामकारकता आणण्यास प्रकाश योजना आणि संगीत योजना कारणीभूत ठरली.

भारताच्या स्वातंत्र्याचा सिंहाचा वाटा असलेल्या महात्मा गांधींच्या अहिंसावादाला विरोध असणार्‍या काहींनी नथूराम गोडसेला गांधीजींची हत्या करण्यास भाग पाडले. त्यास अनेकांनी मदत केली. आपल्या नेत्याच्या आदेशानुसार त्याने हे कृत्य केले. असे या नाट्यात दाखविण्यात आले आहे. देशाच्या फाळणीला आणि पाकिस्तानला दिलेले 55 कोटी रुपये याला महात्मा गांधीच जबाबदार असल्याच्या कारणातून त्यांची हत्या केल्याचे नाटकातील नथूराम प्रथम सांगतो. मात्र, आपल्या भूमिकेतून बाहेर आल्यानंतर काही मुद्दे खोडून काढत तो प्रेक्षकांना आपल्या पश्चात्तापाची प्रांजल कबुलीही देतो. गांधींच्या हत्येला जातीयवाद कारणीभूत आहे असेे भासविण्याचा जाणूनबुजून केलेला प्रयत्नही कसा उघडा पडतो हे फ्लॅश बॅकमधील अनेक प्रसंगातून नथूराम सांगतो. नथूरामला जेलमध्ये भेटण्यास आलेले गांधीजींचे पुत्र देवीदास यांच्या संवादातूनही अनेक बाबी उघड होतात आणि नाटक रंगत जाते.

खून खटल्यास माफीचा साक्षीदार झालेला दिगंबर बडगे नथूरामला भेटण्यास येतो. आपल्यावर गांधीजींच्या हत्येचा कलंक लागू नये म्हणून तो माफीचा साक्षीदार झाल्याचे सांगतो. गांधीजींची हत्या घडविण्यास जबाबदार असलेल्या नेत्यांनी आपली कशी फसवणूक केली हेही नथूरामला तो सांगतो. शेवटचा प्रसंग चालू असतानाच काही प्रेक्षकांनी नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाटकाचा शेवटचा प्रसंग कलाकार शांततेने पूर्ण करतात.

पूर्ण नाटकात नथूरामची भूमिका साकारलेल्या सूज्ञ टोम्पे याने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवले. त्याचे हावभाव, सकारात्मक देहबोली आणि स्पष्ट संवादांनी नथूरामला रंगमंचावर चांगलेच शेवटपर्यंत भक्कमपणे उभे केले. मुख्य भूमिकेला त्याने चांगला न्याय दिला. शेवटच्या प्रसंगात गोंधळ झाला तेव्हाही तो अजिबात डगमगला नाही.

गांधीजींचे सुपुत्र देवीदासला योगेश विलायते यांनी आत्मविश्वासाने रंगमंचावर आणले. आपल्या वाट्याला आलेली भूमिका त्यांनी योग्यरित्या निभावली. त्यांच्या परिपक्व अभिनयाला गंभीर हावभावाची चांगल साथ मिळाली. इन्स्पेक्टर शेखची भूमिका सुनील जगधने यांनी केली. रांगडा इन्स्पेक्टर त्यांनी छानपणे उभा केला. मात्र, संवादात त्यांचा भारदास्तपणा जाणवला नाही. त्यांचे संवाद काहीवेळा फारच क्षीण जाणवले.

ढालूराम, जेलार अर्जुनदासची भूमिका सतीश पवार यांच्याकडे होती. नथूरामला बडविणारा ढालूराम त्यांनी रंगमंचावर आणला. त्यानंतर जेलर अर्जूनदासची भूमिकाही त्यांनी चांगली केली.

पोलीस अधिकारी मेहराला अभिजीत दरेकर यांनी रंगमंचावर आणले. त्यांची देहबोली अन पेहराव अगदी एखाद्या पंजाबी पोलीस अधिकार्‍यासारखा वाटला. त्यांचे शांत, संयमी संवाद छान वाटले. मात्र, त्यांच्या प्रसंगात ते चरख्यापासून लगेचच खाली गेले. तेथे त्यांची एक्झिट चुकली.

महात्मा गांधीजींना शुभम घोडके याने साकारले. त्यांची सडपातळ शरीरयष्टी पात्राला समर्पक वाटली. नारायण आपटे ओम सैंदाणे याने उभा केला. त्याच्या वाट्याला जास्त संवाद आले नाही. मात्र, आलेले संवाद आणि भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न त्याने केला.

लांब केसांचा दिगंबर बडगे ओमकार गाजूलने साकारला. त्याच्या व्यथित अवस्थेतील देहबोलीला निराश संवादाची साथ लाभली.

ऋग्वेद शिराळकर, यशराज जोशी, तेजस अनभुले, खुशी त्रिपाठी, श्रीमती नेहा खोमणे, सृष्टी कुलकर्णी यांनीही नाटकात भूमिका केल्या.

नाटकात मोजकेच नेपथ्य होते. ही जबाबदारी सुप्रिया नलावडे यांनी सांभाळली. प्रसंगांना परिणामकारक करण्यासाठी प्रकाश योजनेचा चांगला वापर करण्यात आला. प्रकाश योजना निरज लिमकर यांच्याकडे होते. स्पॉट लाईट आणि शेवटच्या प्रसंगात पडद्यावर साकारलेला तिरंगा सर्वांनाच आवडला.

संकेश निकम यांनी नाटकातील प्रसंगानुरूप चांगले संगीत दिले. रंगभूषा व वेषभूषा प्रसाद सैंदाणे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केली होती. नथूराम, इन्स्पेक्टर, गांधीजी, त्यांचे शिष्य आणि बडगे यांच्या वेषभूषा हुबेहूब वाटत होत्या.

सुप्रिया नलावडे व मच्छिंद्र साळुंके हे निर्मितीप्रमुख असलेल्या या नाटकाचे सूत्रधार सतीश लोटके होते.

नथूराम गोडसेचे उदात्तीकरण अगदी चुकीचे आहे, असे सांगण्याचा प्रयत्न नाटकातून केला गेला. त्याचा प्रत्यय अनेक प्रसंगातून आला. नाटकाचे लेखन नाट्यरूपात सादर करण्यासाठी कलाकारांनी चांगली मेहनत घेतली. त्या सर्वांचे कौतूकच करायला हवे.

नाटकातील काही मुद्दे न पटल्याने काही प्रेक्षकांनी नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला. जर एखादा मुद्दा पटत नसेल तर तो दिग्दर्शकाला भेटून पटवून देणे गरजेचे असते. नाट्यप्रयोग चालू असताना गोंधळ घालणे योग्य नाही, अशी भावना अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com