राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘चाणक्य विष्णूगुप्त’

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘चाणक्य विष्णूगुप्त’

कृष्णा बेलगावकर | 9860670106

काही ऐतिहासिक पात्रांनी आपल्या मनावर नेहमीचंच गारुड केलं आहे. त्यातलंच एक पात्र म्हणजे आचार्य चाणक्य! प्रचंड बुद्धिवादी आणि विद्वान असलेल्या या व्यक्तिमत्वाबद्दल आजही आपल्यापैकी अनेकांना आकर्षण आहे. इतकंच नाही तर त्यांची ‘चाणक्य नीती’ आपण अनेकदा दैनंदिन जीवनात आणि अगदी व्यवहारातही वापरतो. त्यांच्या याच गोष्टींचं चरित्र आणि चित्ररूप दर्शन घडविणारं नाटक ‘चाणक्य विष्णूगुप्त’ शनिवारी राज्य नाट्य स्पर्धेत पाहायला मिळाले.

इतिहास किंवा पुराण कथा नाट्य प्रयोगातून दाखवताना अनेक जबाबदार्‍या असतात. आपण कोणीच प्रत्यक्षात या पात्रांना पाहिलेलं नसतं. त्यामुळे त्यांच्या हालचाली, त्याचे देहभाव किंबहुना बोलण्याच्या पद्धती याबद्दल विचार करताना कस लागतो. शेवटी इतिहासात ती पात्र खरी असली तरी इथे मात्र आपण काल्पनिकतेतच साकारत असतो.

गो. पु. देशपांडे यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन करताना डॉ.श्याम शिंदे यांनी ही जबाबदारी छान सांभाळली. पात्रांसाठी निवडलेले कलाकार, त्यांचे संवाद, प्रसंग दाखविताना केलेल्या तांत्रिक योजना हे लाजवाब होतं, असंच म्हणावं लागेल. तरीही काही ठिकाणी गडबड झालीच. ते अपवाद वगळता नाटक छान रंगलं.

आचार्य चाणक्य यांची मुख्य भुमका साकारताना प्रा.रविंद्र काळे यांनी अनेकदा प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या वेशभूषेसोबतच त्यांनी टायमिंग साधून दिलेल्या शब्दफेकीमुळे ही भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. चंद्रगुप्त मौर्य अर्थात मगधाचा सम्राट साकारताना संकेत खेडकर या तरुणाने प्रचंड सहजता दाखवत या पात्राला न्याय दिला. यासोबतच महाराद्नी सुवासिनी हे पात्र देखील आरती अकोलकर हिने सुंदर मांडलं. नाटकातील पुढे पुढे सरकत जाणार्‍या प्रसंगांचे संदर्भ देत प्रेक्षकांशी संवाद करताना द्रष्टा अर्थात सूत्रधारही प्रा. प्रसाद बेडेकर यांनी सुंदर साकारला.

नंदची भूमिका रियाज पठाण यांनी आत्मविश्वासाने रंगवली. याबरोबरच अभय गोले (शकटार), सागर अधापुरे (अमात्य राक्षस), डॉ. गोकुळ क्षीरसागर (सिकंदर आणि अश्वलायन), प्रा. योगेश रोकडे (सेल्यूकस), अक्षय कुरकुटे (सारीपुत्त), समीर कुलकर्णी (विरोचक), राजेंद्र घोरपडे (मलयकेतू), राम थोरात (सिंहरण, शिपाई), स्वानंदी भारताल (प्रतिहारी), कल्पेश शिंदे (तिरंदाज, गारूडी, शिपाई) आदी कलाकारांनीही त्यांच्या भूमिका चांगल्या वठवल्या.

बालपणात ऐकलेल्या आचार्य चाणक्य यांच्या गोष्टी अजूनही आपल्या स्मरणात आहेतच. परंतु या नाट्य कलाकृतीमुळे त्या अजून अधोरेखित झाल्या यात शंका नाही. यातली दृश्ये, पात्रांच्या हालचाली, कानावर पडणारे संवाद. नाटकाच्या सुरुवातीलाच चंद्रगुप्त मौर्य आणि सुवासिनी यांची प्रेमकथा प्रेक्षकांना भावूक करते.

नेपथ्याची जबाबदारी दीपक अकोलकर यांनी सांभाळली. चेतन ढवळे यांनी प्रकाश योजना पाहिली. ऋतुध्वज कुलकर्णी यांनी प्रसंगांना चांगले पार्श्वसंगीत दिले. रंगभूषा व वेशभूषा स्वानंदी भारताल व शोभा ढेरे यांनी केली. रंगभूषेसाठी चंद्रकांत सैंदाणे व भाग्यश्री जोशी यांनी मार्गदर्शन केले. रंगमंच व्यवस्था दीपक ओहोळ, सुधीर देशपांडे, मनोज केळगंद्रे, सुहास गवते, अजयकुमार पवार, आकांक्षा शिंदे, शिल्पा सरदेसाई यांनी सांभाळली.

रंगभूषा, वेशभूषा आणि अनेक तंत्रांच्या सहाय्याने इतिहासाचं प्रकटीकरण करताना मोठे आव्हान सप्तरंग थिएटर्सच्या नाट्यसमूहाने पेललं. आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या जीवनातील तो कालखंड, तिथली संस्कृती याचं सादरीकरण करताना लागणारे संदर्भ योग्य पद्धतीने मांडले गेले. परंतु काही अपवाद होतेच. प्रयोगाच्या सुरुवातीला पडद्यामागील कलाकारांच्या रंगमंचावर दिसणार्‍या सावल्या प्रेक्षकांना खटकल्या. चंद्रगुप्तचा संवाद ऐन रंगत आला असताना अचानक दिवा बंद केला जाणं आणि रंगमंचावर अंधार होणं परिणामी तो संवाद अर्धवट ठेवून पात्राची एक्झिट होणं हे प्रेक्षकांना रूचलं नाही.

याशिवाय नाटकातील प्रसंग वेगवेगळी ठिकाणे असल्याचे संदर्भ होते. त्यानुसार पात्रांच्या पायांत पादत्राणांचा वापर झालेला दिसून येत नाही. नेपथ्य सजावट करताना बुद्ध विहार, गंगाकाठ, अरण्यातले प्रसंग दाखविताना अजून काही देखावे समाविष्ट करण्यास वाव होता. आचार्य चाणक्य एक बुद्धिवादी आणि विद्वान होते, मात्र नाट्य प्रयोगाच्या अनेक प्रसंगात ते लांबच लांब संवाद घेताना दिसून येतात. त्यांच्या वाट्याला मोजकेच परंतु प्रभावी संवाद येणं अपेक्षित होतं. पार्श्वसंगीत उत्तम असलं तरीही काही ठिकाणी पाश्चिमात्य संगीताचा वापर झाल्याचे दिसून आले, ऐतिहासिक नाटकांना हे संगीत साजेसं वाटलं नाही. मात्र, एकंदरीत नाटक छान वाटलं. गो.पु.देशपांडे यांच्या संहितेला योग्य न्याय देणारं दिग्दर्शन डॉ. श्याम शिंदे यांनी केलंय, यात कुठलीच शंका नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com