राज्य नाट्य स्पर्धा 2022 : भावनांचा कल्लोळ अनाथ

राज्य नाट्य स्पर्धा 2022 : भावनांचा कल्लोळ अनाथ

संदीप जाधव | 9225320946

जीवनात भावनांना कमालीचे महत्त्व आहे. प्रत्येक भावनेला स्वतंत्र छटा असतात. दैनंदिन घडणार्‍या आपल्या जीवनात आनंद, दुःख, द्वेष, प्रेम, मत्सर, राग, भीती आदी भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. या भावनांच्या कल्लोळाचे प्रगटीकरण काल राज्य नाट्य स्पर्धेच्या ‘अनाथ’ या नाटकात पाहायला मिळाले.

कोपरगावच्या संकल्पना फाउंडेशनची निर्मिती असलेल्या या नाटकाचे लेखक अमेय दक्षिणदास यांनी, तर दिग्दर्शन डॉ. किरण लद्दे यांनी केले आहे. नाटकाचा विषय कलाकारांनी चांगल्याप्रकारे सादर केला. सर्वसामान्य प्रेक्षकांना नाटक समजायला जरासे जड गेले असले तरी दिग्दर्शकाने नाटकासाठी चांगली मेहत घेतल्याचे दिसले.

पडदा उघडताच एकजण खाली पडलेला असतो. त्याच्या भोवती एक प्रेमी युगूल हातात हात घालून फिरत असते. आणि तेथून नाटक फ्लॅशबॅकमध्ये जाते. तो खाली पडलेला तरुण एक लेखक असतो. त्याच्या आयुष्यात घडलेले प्रसंग या फ्लॅश बॅकमध्ये दाखविले आहे. या सर्वच प्रसंगांत त्याच्या भावनांना तो अलंकारीक शब्दरूपाने सादर करतो.

लेखकाचे नाटक पाहून हर्षदा ही समीक्षक त्याची भेट घेते. नंतर त्यांच्यात प्रेमाची भावना तयार होते. दोघांनाही प्रेमाची ओढ असते. मात्र, त्या दोघांच्या प्रेमात हर्षदाचा बालमित्र कृष्णा अडसर ठरत असतो. त्याच्याकडून मानसिक त्रास झाल्यानंतर हर्षदाच्या मानसिकतेवर परिणाम होतो. ती भ्रमिष्ट होते. असंबंध बोलू लागते. तिच्या या आजारावर उपचार करायला हवे असे लेखकाला वाटते. यासाठी तो कृष्णाला समजावतो. मात्र, कृष्णाला हे सर्व माहीत असूनही तो तिला उपचारासंबंधी सांगत नाही.

कारण त्याला भीती असते की, ती जर पूर्ण बरी झाली, तर ती त्याला काहीच किंमत देणार नाही. अशातच लेखक तिला प्रेम व मैत्री यात एक निवडायला सांगतो. मात्र, लेखकाला अपमानित करून ती मैत्रीला प्राधान्य देते. लेखक कमालीचा अस्वस्थ होतो. त्याला विविध भास होऊ लागतात आणि तो शेवटी एकटाच म्हणजेच जणू काय तो अनाथच राहतो. असे कथानक असलेल्या नाटकात लेखक आपल्या भावना व्यक्त करताना अलंकारिक वाक्यांचा वापर करतो. काही वेळ हे स्वगतच आहे की काय, असे वाटते.

प्रत्येक वेळी वेगळ्या छाटणीचे नाटक सादर करणारे दिग्दर्शक डॉ. किरण लद्दे यांनी कलाकारांकडून चांगली तयारी करून घेतल्याचे नाटकात दिसले.

मध्यवर्ती भूमिकेत असलेला प्रतिभावंत लेखक डॉ. मयूर तिरमखे यांनी रंगमंचावर उभा केला. प्रत्येक प्रसंगात त्यांचा वावर अतिशय नैसर्गिक वाटला. त्यांच्या अभिनयाला हावभावांची आणि संवादांची चांगली जोड मिळाली.

नाट्य समीक्षक असलेली हर्षदा अबोली जोशी हिने रंगवली. सामान्य अवस्थेत असतानाच्या तिच्या अभिनयापेक्षा भ्रमिष्ट अवस्थेतील अभिनय चांगलाच भाव खाऊन गेला. भेदरलेल्या अवस्थेत तिचे संवादही कौतूकास्पदच होते.

कृष्णाची भूमिका प्रथमेश पिंगळे याने साकारली. जरासा कावेबाज असलेला कृष्णा त्याने छान रंगवला. संवादफेक जरासी कमी पडली.

नाटकाच्या सुरुवातीला आणि शेवटी आकाश खंडागळे व प्राजक्ता जोशी यांच्या वाट्याला आलेली भूूमिका त्यांनी चांगली निभावली.

नेपथ्याची जबाबदारी चेतन गवळी व अमित तिरमखे यांच्याकडे होती. लेखकाची खोली, त्यात असलेले पुस्तक, भिंतीवरील गिटाराचे पोस्टर छान वाटले.

प्रसंगानुरूप समपर्क संगीत देण्याचे काम सुमित खरात यांनी केले. अनेक प्रसंगांत त्यांनी दिलेले संगीत भावले. प्रसंगांत परिणामकारकता आणण्यासाठी आवश्यक असलेली प्रकाश योजना ही नाटकाची सर्वांत जमेची बाजू ठरली. डॉ. किरण लद्दे छान लाईट दिले. अनेक रंगीबेरंगी व स्पॉट लाईटचा वापर त्यांनी कल्पकतेने केला.

रंगभूषा प्राजक्ता जोशी हिने केली होती. वेषभूषेची जबाबदारी डॉ. आस्था तिरमखे यांच्याकडे होती. प्रत्येक प्रसंगात लेखकाचे एकाच पॅटर्नचे वेगवेगळे शर्ट पाहायला मिळाले. कोरसचा पेहरावही चांगला वाटला. रंगमंच व्यवस्था गणेश सपकाळ, वैभव आगळे, प्रसाद सोनवणे यांनी पाहिली.

विविध भावनांच्या प्रगटीकरणाचे सादरीकरण नाटकात पाहायला मिळाले. दिग्दर्शक डॉ. किरण लद्दे यांनी या नाटकात चांगलाच जीव ओतून काम केल्याचे दिसले. नाटकात विशेष कथानक नव्हते. मात्र, आंतरिक भावनांचा कल्लोळ दाखविताना त्यांना कलाकारांची साथ मिळाली. अनेक प्रेक्षकांना मात्र नाटकाचा विषय शेवटपर्यंत समजला नाही. पण लेखकाचा प्रयत्न चांगलाच म्हणावा लागेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com