
संगमनेर |वार्ताहर| Sangamner
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य संपादणूक सर्वेक्षण अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी यासाठीच्या सर्वेक्षणात सहभाग नोंदविला होता. करोनानंतर राज्याचे विद्यार्थी प्रथमच या सर्वेक्षणाला सामोरे गेले होते.
परिषदेच्या वतीने राज्यात घेण्यात आलेल्या संपादणूक सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील 11 हजार 9336 शाळांनी सहभाग नोंदवला होता. या शाळांमधील दोन लाख 53 हजार 449 इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीच्या वर्गांना शिकणार्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या सर्वेक्षणामध्ये इयत्ता तिसरीतील 66 हजार 695 विद्यार्थी, इयत्ता पाचवी मधील 83 हजार 968 विद्यार्थी व आठवीमध्ये शिकणारी 1 लाख 2 हजार 786 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये 53.99 टक्के शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांचा तर 46.1 टक्के खाजगी अनुदानितमधील शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सर्वेक्षणात 16.02 टक्के अनुसूचीत जाती, 16.54 टक्के अनुसूचित जमाती, 22.75 टक्के इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी, 27.39 टक्के सर्वसाधारण संवर्गातील, 15.7 टक्के भटक्या विमुक्त जाती जमाती व 1.6 टक्के विद्यार्थी विशेष प्रवर्गातील सहभागी झाले होते.
झालेल्या संपादणूक सर्वेक्षणात इयत्ता तिसरीमध्ये प्रथम भाषा मराठी मध्ये राज्याची सरासरी 76.99 टक्के आहे. पाचवी मध्ये 62.21 टक्के आठवी मध्ये 69.52 टक्के तर गणितामध्ये तिसरीत 68.50 टक्के, पाचवीत 64.47 टक्के व आठवीमधील 49.10 टक्के संपादणूक प्राप्त झाली आहे. इयत्ता तिसरी मध्ये 76 टक्के पेक्षा अधिक अचूक प्रतिसाद देणार्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. तिसरीत मराठी विषयासाठी 61.54 टक्के, गणित विषयासाठी 49.02 टक्के, पाचवीसाठी भाषेत 23.8 टक्के, गणितासाठी 39.6 टक्के, आठवीसाठी मराठी विषयात 49.17 टक्के आणि गणित विषयासाठी अवघी 9.65 संपादणूक प्राप्त झाली आहे.
राज्याच्या सरासरी संपादणूक अहवाल लक्षात घेता राज्यात सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांची आघाडी राहिली आहे. राज्याच्या संपादणूकीत करोनाच्या कालाखंडात झालेल्या अध्ययन क्षतीचा परिणाम झालेला असल्याचे दिसत आहे. प्राथमिक स्तरातील निम्म स्तरापासून तर उच्च प्राथमिक स्तरावर प्रवास करताना संपादणूक कमी होत असल्याचे अहवालात स्पष्ट दिसत आहे. अचूक प्रश्नाला प्रतिसाद देणार्या टक्केवारीचा विचार करता तीस टक्क्यांपेक्षा कमी प्रश्नांना अचूक प्रतिसाद देणार्या विद्यार्थ्यांची संख्या तिसरीत भाषेसाठी 4.95 टक्के गणितात 8.03, पाचवीसाठी भाषेत 7.76 व गणित विषयासाठी 8.22 तर आठवीसाठी 3.62 व गणितात 22.76 टक्के प्रतिसाद नोंदविण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्हा कोठे ?
इयत्ता तिसरीत मराठी भाषा विषय संपादणूकीत अहमदनगर जिल्हा पाचव्या स्थानावर, गणितात सहाव्या स्थानावर.पाचवीत मराठी विषयात विसाव्या स्थानी, गणितात नवव्या स्थानावर आहे. आठवीत इयत्तेत मराठी विषयाच्या संपादणूकीत सहाव्या स्थानावर तर गणितात 14 व्या स्थानावर आहे.प्राथमिक स्तरावरील इयत्ता तिसरीची गुणवत्ता जिल्ह्यात अधिक चांगली असल्याचे समोर आले आहे.