
अहमदनगर (प्रतिनिधी)
राज्यातील सहकार क्षेत्राला पुन्हा एकदा उभारी देताना आजारी साखर कारखाने यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
त्यानुसार राज्यातील ऊस लागवडीचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारच्या आदेशानुसार आजारी साखर कारखान्यांसाठी सामोपचार कर्ज परतफेड योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे.
राज्यात मधल्या काळात काही वर्षे साखर उद्योग मोठ्या संकटात होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या उद्योगाने कात टाकली असून साखरे सोबतच अन्य पर्यायी उत्पादनांच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असल्याने साखर उद्योगाला चांगले दिवस येत आहेत. यंदा तर विक्रमी 1 हजार 320 लाख टन उसाचे गाळप करून 1 हजार 372 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
यंदाच्या हंगामात ऊस वाढल्याने गाळपाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी यंदा विक्रमी 173 दिवस गाळप हंगाम चालूनही काही भागात ऊस शिल्लक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच पुढील हंगामात उसाचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून पुढील गळीत हंगामात उसाचे गाळप सरकारची मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे बंद पडलेल्या साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत.
8-10 कारखान्यांना संजीवनी शक्य
थकीत कर्जामुळे राज्य बँकेने जप्त केलेले आजारी साखर कारखाने या योजनेनुसार पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्य बँकेने सामोपचार कर्ज परतफेड योजना आखली आहे. सुमारे 1 हजार 600 कोटींचे कर्ज थकविल्यामुळे राज्य बँकेने 25 ते 30 कारखाने जप्त केले असून यंदा त्यातील 8-10 कारखाने सुरू झालेत.
सामोपचार योजना काय?
कारखान्यांचे कर्ज थकीत झाल्यापासून, त्यावर 6 टक्के सरळ व्याज दराने आकारणीतून निर्धारित होणारी एकूण तडजोड रक्कम चार वर्षांत भरण्याची कारखान्यांना मुभा देण्यात येणार आहे. तसेच जप्त करण्यात आलेले कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात येणार असल्याची माहिती राज्य बँकेतील सूत्रांनी दिली. बँकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात येणार असून त्याला मान्यता मिळाल्यावर या योजनेचा सविस्तर तपशील जाहीर केला जाईल असेही सूत्रांनी सांगितले.
चालू हंगामात एकूण 1 हजार 320 लाख मेट्रिक टन गाळप झाले आणि 1 हजार 372 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले. राज्यात सर्वात जास्त गाळप माढा येतील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांचे झाले 24 लाख टन झाले असून नेहमी प्रमाणे कोल्हापूर जिल्हा साखर उतार्यात अव्वल म्हणजे 11.80 टक्के साखर उतारा घेऊन प्रथम आला आहे. साखर कारखानदारीतून राज्यातील शेतकर्याां 42 हजार कोटीची रक्कम शेतकर्यांना मिळणार आहे. तसेच इथेनॉलचे उत्पादन वाढल्यामुळे एमएससी बँकेचे साखर कर्ज तरण रक्कम कमी झाली आहे. साखर निर्यात झाल्यामुळे कारखान्यांना जादा रक्कम मिळाली आणि त्यांचे कर्जावरील व्याज वाचले आहे. इथेनॉल मिश्रणाचा फायदा असा झाला की आपले परकीय चलन वाचले आहे. तसेच कामगारांची देणी वेळेत देता आली आणि हंगाम लांबला असल्यामुळे कामगारांना एक महिन्यांचा पगार जादा मिळला.
अनंत निकम, साखर कारखानादारी अभ्यासक, पुणे.