इंटरसिटीची झूकझूक ट्रॅकवरच

नगर-पुणे आणि मुंबई-शिर्डी इंटरसिटी रेल्वे तातडीने सुरू करा - आमदार संग्राम जगताप
इंटरसिटीची झूकझूक ट्रॅकवरच

अहमदनगर (प्रतिनिधी) -

पुणे-नगर इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याच्या मागणीला आ. संग्राम जगताप यांनी नव्याने फोडणी दिली आहे. रेल्वे ट्रॅक रेडी असून तातडीने इंटरसिटी

सुरू करावी. कोवीड काळात नगरमार्गे शिर्डीला जाणार्‍या पॅसेंजर बंद असल्याने साईभक्तांची अडचण निर्माण होत आहे. नगर-पुणे आणि मुंबई-शिर्डी इंटरसिटी रेल्वे तातडीने सुरू करावी, अशी मागणी त्यांनी नगरच्या रेल्वे प्रबंधकांकडे केली आहे.

शिर्डीला जाणार्‍या भाविकांसाठी मुंबई-शिर्डी आणि नगर-पुणे रेल्वे सोईच्या होत्या. दररोज सुमारे दोन हजार साईभक्त याच रेल्वेने शिर्डीत पोहचत. कोवीड काळात मार्च 2020 पासून शिर्डीकडे जाणार्‍या सगळ्याच पॅसेंजर बंद आहेत. त्यामुळे भाविकांना शिर्डीत येणे अडचणीचे होत आहे. ही रेल्वे सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी आ. जगताप यांनी नगरचे रेल्वे स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे केली आहे.

माजी नगरसेवक विजय गव्हाळे, संभाजी पवार, ए.एन. शर्मा, रामेश्वर मिना, आर.के. बावडे, महेश सुपेकर, खलील मन्यार, नंदु लांडगे, महाळू शिपणकर, गौरव गव्हाळे, भाऊसाहेब चौधरी, संजय जरबंडी आ. जगताप यांच्यासमवेत उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेसाठी ट्रॅक रेडी असल्याचे सांगण्यात आले. दौंडपासून अलिकडेच बायपास मार्ग तयार करून तो थेट पुण्यापर्यंत काढण्यात आला आहे. त्यामुळे नगरहून पुण्याला जाणारी रेल्वे दौंडला न जाता थेट पुण्यात तेही दोन तासात पोहचणे शक्य आहे. गत वर्षभरापासून हा ट्रॅक रेडी असला तरी त्यावरून रेल्वे मात्र धावत नाही, अशी माहिती चर्चेतून समोर आली.

अहमदनगर ते पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या मोठी आहे. खाजगी वाहने, बसेसने नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी असे हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यातून रस्ते वाहतुकीवर ताण येतो, रहदारी खोळंबणे, अपघात आदी समस्या निर्माण होऊन वेळ, इंधन व पैशांचा अपव्यय होतो. हे सर्व टाळण्यासाठी अहमदनगर ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरु करावी, अशी मागणी आ. जगताप यांनी केली आहे.

झेलम-गोवा, केकेच फक्त सुरू

कोवीडनंतर काही रेल्वे गाड्या सुरू झाल्या. पण त्या फक्त सुपर फास्ट आहेत. गोवा, झेलम, केके या तीनच गाड्या नगरहून धावतात. त्या गाड्यात प्रवास करण्याकरीता अगोदर आरक्षण करावे लागते. त्याशिवाय त्या गाडीत जागा मिळत नाही. त्यामुळे नगर ते शिर्डी प्रवास करणार्‍या प्रवाशांना जागाच मिळत नाही.

रेल्वेमुळे नगर-पुणे प्रवास फक्त दोन तासात होईल. नगरकरांची पैशाची तसेच वेळीची बचत होणार आहे. रेल्वेलाही उत्पन्न वाढेल. रेल्वे दळणवळणाचे परवडण्याजोगे साधन उपलब्ध झाल्याने नगर शहर व परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे याबाबतचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करावा. याबाबत मी स्वत: पाठपुरावा करणार आहे.

- आमदार संग्राम जगताप

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com