
अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
करोनाच्या काळात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या रुग्णवाहीका चालकांअभावी उभे आहेत. अरोग्य कर्मचार्यांचे पगार थकले असून वाहने दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. यासह जिल्हा परिषदेत असणार्या अडचणीचा पाढाच अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी पालकमंत्र्यासमोर वाचला. स्वतंत्रदिनाच्या पूर्व संध्येला अध्यक्षा घुले यांनी पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या विविध प्रश्न आणि मागण्या सादर केल्या.
जिल्हा परिषदेचे प्रश्न व विकास कामासंदर्भात पालकमंत्री ना. मुश्रीफ यांनी नगरच्या शासकीय विश्रागृहावर आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात चर्चा झाली. यावेळी आरोग्य विभागातील अडचणी पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून ते तातडीने भरणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री यांना सांगण्यात आले. तसेच 108 क्रमांकांची रुग्णवाहीकांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली.
ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक शाळेसाठी नवीन वर्गखोल्या व दुरुस्तीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याप्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्यामुळे काम करतांना अडचण निर्माण होत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने हा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करण्यात आली. ग्रामीण भागात रस्ते दुरुस्तीसाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज असून त्यासाठी 3054 लेखाशिर्ष अंतर्गत भरीव निधी मिळावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
त्यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अडीअडचणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा करून आरोग्य विभागाच्या अडीअडचणी बाबत मंत्रालयस्तारवर बैठक घेण्याचा निर्णय घेतला. तसेच इतर विभागाच्या अडचणीबाबत संबंधित विभागाच्या मंत्रालयस्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी पालकमंत्रीयांनी दूरध्वनीद्वारे चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या. यावेळी अध्यक्षा घुले, आ. रोहित पवार, आ. संग्राम जगताप, आ. डॉ. किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, काँग्रेस पक्षाचे गटनेते अजय फटांगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आणि खाते प्रमुख उपस्थित होते.