अहमदनगर (प्रतिनिधी) -

स्थायी समितीने तयार केलेला मनपाचा अर्थसंकल्प मंगळवारी महासभेत महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे सादर करण्यात

आला. 685 कोटींच्या अर्थसंकल्पात 21 कोटी 65 लाखांच्या वाढीव तरतुदींची शिफारस करत एकूण 706 कोटी 65 लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला.

महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा मंगळवारी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी समितीमध्ये मंजूर झालेला अर्थसंकल्प महापौर बाबासाहेब वाकळे यांना सादर केला. यामध्ये उत्पन्न वाढीसाठी नवीन घरांना घरपट्टी आकारणे, यासाठी मनपातर्फे नवीन घरांचे सर्वेक्षण करणे, रस्त्याच्या कडेला उभारण्यात येणार्या पत्र्याच्या गाळ्यांना पट्टीची आकारणी करणे, अनधिकृत बांधकामांना नियमानुसार नियमित करणे, थकित मालमत्ता करासाठी स्वतंत्र वसुली मोहीम राबविणे, बेकायदेशीर नळजोड शोधून त्यांना पट्टी आकारणे, शाळा खोल्यांचे भाडे वसूल करणे तसेच बंद असलेल्या शाळा चांगल्या शिक्षण संस्थांना भाडेपट्टीने देणे असे उत्पन्नाचे पर्याय सुचविण्यात आले आहेत. तसेच नेहरू मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौक आणि सावेडी गावामध्ये शॉपिंग सेंटरची उभारणे. त्यासाठी एफबीटी, बीओटी, वित्त संस्था यांचे आर्थिक सहकार्य घेऊन बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची शिफारस करण्यात आली. देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीसाठी निधी उपलब्ध झाला असून ती तातडीने सुरू करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. अर्थसंकल्प सभापती घुले यांनी महापौर वाकळे यांच्याकडे मंगळवारी सादर केल्यानंतर अभ्यासासाठी एक दिवस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मंगळवारची सभा तहकूब करून अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आज (बुधवारी) दुपारी एक वाजता तहकूब सभा घेण्याचा निर्णय महापौर वाकळे यांनी जाहीर केला.