60 टक्के स्मार्ट एलईडी दिवे बंदच !

स्थायीच्या सभेत नगरसेवकांचा दावा
60 टक्के स्मार्ट एलईडी दिवे बंदच !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापौर, उपमहापौर, सभापती अशा पदाधिकार्‍यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या प्रभागात पथदिवे बसवून घेतले आहेत. इतर नगरसेवकांना पथदिवे व वीजपुरवठा होण्यासाठी मनपाकडून वायरच मिळत नाही, अशा तक्रारी करत नगर शहरात लावलेले 60 टक्के स्मार्ट एलईडी दिवे बंद असल्याचा दावा नगरसेवक प्रशांत गायकवाड व मुदस्सर शेख यांनी केला. नगरसेवकांकडून करण्यात आलेल्या स्मार्ट दिव्यांच्या तक्रारीनंतर सभापती कुमार वाकळे यांनी पुढच्या स्थायी समिती सभेत पथदिवे विषय अजेंड्यावर घेण्याचे आदेश दिले.

सोमवारी स्थायी समितीची सभा सभापती वाकळेंच्या अध्यक्षतेखाली झाली. सभापती वाकळे यांनी सावेडी-बोल्हेगाव प्रभागात सीना नदीच्या कडेला टाकला जाणारा बांधकाम साहित्याचा राडारोडा उचलला जावा व तो टाकणार्‍यांवर कारवाई करावी, अशी तक्रार केली होती. प्रभाग अधिकार्‍यापासून घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख व प्रभाग केअर टेकरला फोन केले. तरीही ही समस्या सुटली नसल्याने सभापती वाकळे यांनी घनकचरा विभागाचे प्रमुख डॉ. शंकर शेडाळे यांना कामकरा नाही तर राजीनामा द्या, तुम्ही काय शहराचे जावई नाही, अशा शब्दांत फटकारले.

भिंगार नाल्यावर पूल व रस्ता, आनंदऋषीजी समाधी स्थळाजवळील रस्ता, तपोवन रोड परिसरातील ढवण वस्तीसाठी पाईपलाईन, मनपाचा ऑक्सिजन प्लॅन्ट, पाडकाम कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी संस्था नियुक्ती, सर्जेपुरातील जुन्या समाजमंदिराचे निष्कासन, जिल्हा बँकेशेजारून राशीन देवी मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर पे अँड पार्क मंजुरी अशा विविध विषयांवर सभेत चर्चा होऊन ते मंजूर झाले. या विषयांच्या अनुषंगाने शहरातील पथदिवे प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा आदी विषयांवरही सभेत चर्चा झाली.

Related Stories

No stories found.