दिव्यांग शाळेतील कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी फरकासहीत सातवे वेतन अदा करावे

...अन्यथा मंत्रालयासमोर लोटांगण आंदोलन
दिव्यांग शाळेतील कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी फरकासहीत सातवे वेतन अदा करावे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दिव्यांग शाळेतील कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी सातवा वेतन आयोगानुसार फरकासहित वेतन अदा करण्यात आले नाही तर मंत्रालयासमोर व दिव्यांग आयुक्त कार्यालयासमोर राज्यव्यापी लोटांगण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्यस्तरीय दिव्यांग शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास संघटनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या सहकार्याने सातवा वेतन आयोगाचा शासन निर्णय एप्रिल 2021 मध्ये सामाजिक न्याय विभागाकडून पारित करण्यात आला. महाराष्ट्र शासनातर्फे सन 2016 ला सातवा वेतन आयोग सर्व विभागासाठी लागू करण्यात आला. तथापि चार वर्षांनंतर सामाजिक न्याय विभागातील दिव्यांग शाळांना तो आदेश लागू करण्यात आला. शासन निर्णय पारित होऊन आज ऑक्टोबर 21 ला सात महिने झाले. परंतु अद्यापी दिव्यांग शाळेतील कर्मचारी वर्गास सातवा वेतन अदा करण्यात आलेला नाही.

सामाजिक न्याय विभाग सचिव कार्यालय व दिव्यांग आयुक्त कार्यालय यांच्यात ताळमेळ नसल्याकारणाने सातवा वेतन आयोग म्हणजे दिव्यांग शाळेतील कर्मचारी वर्गासाठी दिवास्वप्नच ठरत आहे. सातवा वेतन आयोग वेतन निश्चितीमधील दिरंगाई, जिल्हा समाज कल्याण कार्यालयाचा निरूत्साह व ऑनलाईन सातवा वेतन आयोगासाठी आवश्यक असणारा आयटी विभागामार्फत कार्यान्वित होणारा टॅब अद्यापही कार्यान्वित नसल्यामूळे दिव्यांग शाळेतील सातवा वेतन आयोग टॅबच्या विळख्यामध्ये अडकून पडला की काय? असा संभ्रम कर्मचारी वर्गात निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासन आयटी विभागाला टॅब निर्मिती करिता टेंडर देते. त्या विभागाचे 38 लाख रुपये कर्मचारी वेतन अद्याप दिले नसल्याने कर्मचारी काम करत नाही. परंतु या ठेकेदारीचा फटका मात्र दिव्यांग शाळेतील कर्मचारी वर्गास बसत आहे.

आ. डॉ. सुधीर तांबे व दिव्यांग शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे यांनी टॅब कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. परंतु सामाजिक न्याय विभागाचे उदासीन धोरण कर्मचारी वर्गाचा सातवा वेतन आयोग अंमलबजावणीसाठी विलंब करीत आहे.

दिवाळीपूर्वी सातवा वेतन आयोगानूसार फरकासहित वेतन अदा केले नाहीतर मंत्रालयासमोर व दिव्यांग आयुक्त कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन करण्याचा इशारा राज्यस्तरीय दिव्यांग शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समितीचे संजय साळवे, नारायण डूकरे, चांगदेव खेमनर (अहमदनगर), रावसाहेब कांबळे, भाउसाहेब कांबळे (पूणे), सचिन बिराजदार (लातूर), महेंद्र वाघमोडे, बाळासाहेब भूजबळ (नाशिक), आलोक कुलकर्णी (बीड), प्रशांत घाडगे, अरविंद राउत (अमरावती), मधूकर मोरे, विलास पंडित (मूंबई), विठ्ठल शिंदे (सोलापूर), कृष्णसिंग तोमर, राजेंद्र कांबळे (औरंगाबाद), कु.कल्पना ठाकरे, विनोद दारोळी (नागपूर), रणधीर पाटील (सातारा), संजय बलाढ्ये (रत्नागिरी), संतोष गायकवाड (कोल्हापूर), राजन जाधव (जालना), निलेश घनवट, भगवान तलवारे (ठाणे), संजय सुतार (धुळे), संजय पेचे, महेश भगत (चंद्रपूर) सचिन मूळे, रमेश टिक्कल, प्रदीप भोसले आदींनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com