एसटीचा संप गरिबांच्या मुळावर; अव्वाच्या सव्वा प्रवासभाड्याची वसुली

एसटीचा संप गरिबांच्या मुळावर; अव्वाच्या सव्वा प्रवासभाड्याची वसुली

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

पंधरा दिवसांतून अधिक काळ एसटीचा संप सुरू असून त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. शहरी भागातही त्याचा काहीसा परिणाम जाणवत असला, तरी यानिमित्ताने शासनाने खाजगी वाहतूकदारांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. तथापि खाजगी वाहतूक गरिबांच्या मुळावरच आली आहे. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी प्रवासी जनतेच्यावतीने करण्यात येत आहे.

राज्यातील एस. टी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश आगारातील बसेसच्या वाहतूक बंद आहेत. रस्त्यावरती बसेस उपलब्ध नसल्यामुळे प्रवासी जनतेला नाईलाज म्हणून खाजगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र खाजगी वाहतूकदारांनी या काळात संधीचे सोने करण्याचा जणू निर्णय घेतला आहे. यापूर्वी एसटी आगाराच्या आजूबाजूला विशिष्ट अंतराच्या पलीकडे खाजगी वाहने लावण्याची परवानगी देण्यात येत होती. आता मात्र एस.टी आगारामध्ये खाजगी वाहतुकीची वाहने लावण्यात येत आहेत. मात्र या वाहतुकीसाठी खाजगी वाहन चालक प्रवासी जनतेकडून दामदुप्पट वसुली करत असल्याचे चित्र समोर आले आहे. ते प्रवासी जनतेला पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अव्वाच्या सव्वा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.

राज्य शासनाने नागरिकांची कुचंबना होऊ नये. यासाठी संप मिटेपर्यंत खाजगी वाहनाने प्रवासी वाहतूक करण्याची अनुमती दिली आहे. तथापि या वाहतूकदारांनी वरती प्रवासी दराची सक्ती करण्यात आली नसल्याचे समजते. त्याचा फायदा घेत लूट सुरू आहेत. यासंदर्भाने प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी संबंधित वाहनांवरती कारवाई करून होणारी लूट थांबवावी, अशी मागणी प्रवासी जनतेच्या वतीने करण्यात येत आहेत.

दुप्पट वसुली

संगमनेर येथून पुणे येथे जाण्यासाठी साध्या बसचे भाडे 210 रुपये, निम आराम बसचे भाडे सुमारे तीनशे रुपये आहे. मात्र संगमनेर येथून खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने प्रवाशांकडून पाचशे ते सहाशे रुपयांची वसुली करत आहेत. नाशिकसाठी 90 रुपये भाडे असताना दोनशे रुपयांपर्यंत भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहेत. मुंबई करिता सुमारे साडेचारशे ते सहाशे रुपये मोजावे लागत आहेत.अतिरिक्त भाडे का? असा प्रश्न विचारला असता पुणे व नाशिकवरून येताना प्रवासी मिळत नाहीत. असे थातुरमातुर कारण सांगून प्रवासी लुटण्यात धन्यता मानत येत आहे. ज्याअर्थी राज्यात सर्वत्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहेत त्या अर्थी सर्व मार्गावर प्रवासी उपलब्ध आहे, असे असताना देखील प्रवाशांची लूटमार चिंताजनक आहे.

कारवाईची प्रवासी वर्गाची मागणी

राज्य शासनाने खाजगी वाहतुकीला परवानगी दिली असल्याने संबंधितांना एसटीच्या दरानेच वाहतूक करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे त्याबरोबरच प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वाहनांमध्ये जितके प्रवासी बसविण्याचा नियम करण्यात आला आहे त्यापेक्षा अधिक प्रवासी वाहनात बसविण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. यासाठी खाजगी वाहतूक करणार्‍या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी नियुक्त करून प्रवाशांची सोय करावी, अशी मागणी पुढे आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किती गरजेचे आहे. हेच यानिमित्ताने समोर आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com