इच्छा मरणाची परवानगी द्या

पाथर्डीतील एसटी कामगारांचे राज्य सरकाला पत्र
इच्छा मरणाची परवानगी द्या

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

राज्यात सुरू असलेल्या एसटी संपाला 2 महिने उलटून गेल्यानंतरही कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, तसेच एसटी कर्मचारीही तणावाखाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता एसटी कर्मचार्‍यांनी सरकारला पत्र लिहून आपल्या वेदना मांडल्या आहेत. तसेच सरकारकडे इच्छा मरणासाठी परवानगी मागितली आहे.

एसटी कर्मचार्‍यांच्या संप काळात 67 कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली आहे. आमच्याही मनात सतत आत्महत्येचा विचार येत आहे. मात्र, आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे सरकारनेच आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी पाथर्डी येथील एसटी डेपोतील कर्मचार्‍यांनी केली आहे. पाथर्डी आगारातील एसटी कर्मचार्‍यांनी पाथर्डीच्या तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की, राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांसाठी लक्ष घालावे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात यावी, मागण्या पूर्ण करता येत नसतील तर आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी तरी द्यावी, अशी मागणीही कर्मचार्‍यांनी केली आहे.

एसटी कर्मचार्‍यांची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नाही. आम्ही सतत तणावाखाली वावरत आहोत. राज्यातील इतर शासकीय कर्मचार्‍यांच्या तुलनेत एसटी कर्मचारी यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांना मिळणारे तुटपुंजे वेतन तसंच इतर प्रकारे होणार्‍या मानसिक त्रासामुळे 67 कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली आहे. तशीच मनस्थिती आमच्या सर्व कर्मचार्‍यांचीही आहे. आमच्याही मनात आत्महत्या करण्यासारखे विचार येत आहे. परंतु आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने आत्महत्या करू शकत नाही. त्यामुळे स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशा शब्दांत एसटी कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून आपल्या वेदना मांडल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com