एसटी कर्मचार्‍यांचा कुटुंबियांसह तहसील कार्यालयावर मोर्चा

महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी
एसटी कर्मचार्‍यांचा कुटुंबियांसह तहसील कार्यालयावर मोर्चा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कामगारांनी कुटुंबियांसह पाथर्डी सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. कामगार एकजुटीचा विजय असो, बेताल वक्तव्य करणार्‍या खा. राऊतांचा निषेध असो, एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण झालेच पाहिजे, अशा घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर जाऊन धडकला.

यावेळी विविध पक्षातील नेते ,कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. सरकारचा निषेध व्यक्त करत कर्मचार्‍यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली. एसटी कर्मचार्‍यांसह कुटुंबियांनी रविवारी शहरातील बाजारपेठेत फिरून बंद ठेवण्याचे अवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला बहुसंख्य व्यापार्‍यांनी पाठिंबा दिला. सोमवारी सकाळी कर्मचार्‍यांनी कुटुंबियांसह नवीन बस स्थानकापासून मोर्चाला सुरुवात केली. जुने बसस्थानक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर गेला.

यावेळी मोर्चात भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शहराध्यक्ष अजय भंडारी, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, नगरसेवक महेश बोरुडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे, तालुकाध्यक्ष सचिन वायकर, विष्णूपंत अकोलकर, सुनील ओव्हळ, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते किसन चव्हाण, अरविंद सोनटक्के, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र म्हस्के, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरसाळे, अविनाश पालवे, महेश अंगारखे, परमेश्वर टकले, अक्षय शिरसाठ, अर्जुन धायतडक, विनोद थोरात आदींनी सहभागी होत आंदोलनाला पाठींबा दिला.

एसटी महामंडळामध्ये सर्वसामान्यांची मुले नोकरी करतात. एसटीने प्रवास करणारा माणूस हा देखील गरीब कुटुंबातला असतो. ग्रामीण भागात शेवटच्या माणसापर्यंत एसटी जाते. गोर गरिबांची नाळ एसटी बरोबर जोडलेली आहे. या सर्व बाबींचा सरकारने विचार करावा, अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी दिला. दत्तात्रय खेडकर, संतोष आंधळे, किरण गारुडकर, बाबासाहेब गायकवाड, किरण दहिफळे, सुभाष खेडकर, राधा अबुज, राधा माळी, वर्षा घोरपडे, दीपा रोडे, मनीषा गिरी आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.नायब तहसीलदार संजय माळी यांना निवेदन देण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com