एस.टी. कर्मचार्‍यांचा तहसीलवर मोर्चा, भाजपासह इतर पक्षाचा कर्मचार्‍यांना पाठिंबा

एस.टी. कर्मचार्‍यांचा तहसीलवर मोर्चा, भाजपासह इतर पक्षाचा कर्मचार्‍यांना पाठिंबा

अकोले |प्रतिनिधी| Akole

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अकोले डेपोतील कर्मचार्‍यांनी विलीनिगिकरणासह इतर मागण्यासाठी आज तहसिल कार्यालयावर मोर्चा नेऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी भाजपा, मनसे, माकप आदी पक्षाचे पदाधिकारी व नेत्यांनी एस टी कर्मचार्‍यांचे आंदोलनास जाहिर पाठिंबा दिला.

गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळ कर्मचार्‍याचे शासनात विलिगिकरण व इतर मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. एस. टी. कर्मचारी संपावर आहेत. यामध्ये अकोले डेपोचे कर्मचारीही सहभागी असून आज अकोले एस. टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी डॅा. अजित नवले, जिल्हा परिषद सदस्य व गटनेते जालिंदर वाकचौरे, संभाजी ब्रिगेडचे डॅा.संदिप कडलग, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, प्रियंका चासकर (छात्र भारती संघटना, अकोले), शशिकांत केदार, व्यापारी संघटनेचे अनिल भळगट, चंद्रकांत सरोदे, अनिल झोळेकर आदी उपस्थित होते.

अकोले आगारातून निघालेला हा मोर्चा घोषणा देत तहसील कार्यालयाचे गेटवर येऊन तेथे सभा झाली. यावेळी बोलताना माकपचे राज्यसचिव डॉ. अजित नवले म्हणाले, राज्यात सुरु असलेला लढा अकोलेतही तेवत आहे. माणुसकीच्या व माणवतेच्या नात्याने तुमच्यासोबत आहोत. तुमची लढाई वेगळ्या वळणावर आली आहे. आता तुमचा खरा लढा सुरु झाला आहे. दरवेळी तुम्ही पगारवाढ, बोनस मागत होता ते तुम्हाला देत होते. मात्र यावेळी तुम्ही अचूक ठिकाणी घाव घातला आहे. त्यांना कोंडीत पकडले आहे. मात्र एस.टी. महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करा, ही मागणी सहजासहजी तुम्हाला हे सरकार देणार नाही. सरकारचे मंत्र्यांना फक्त गोल गोल भाषण करायचे, परंतु कामगारांचे बाजूने निर्णय घ्यायचे नाही, अशी अवस्था आहे. राज्यातील सर्व विभागातील कामगारांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.

भाजपाचे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे पाठिंबा देताना म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून एस.टी. महामंडळ कर्मचार्‍यांच्या रास्त मागण्या आहे.त्या मागण्यांकडे हे मस्तवाल सरकार दुर्लक्ष करत आहे. सरकारी कर्मचारी कोरोनात मृत्यू झाला तर या सरकारने 50 लाख दिले. मात्र करोनानेच एस. टी.चे 350 कर्मचारी मृत्यू झाले. त्यांना मात्र या सरकारने काहीही दिले नाही. एस. टी. कर्मचार्‍यांचे किती कष्ट व मेहनत आहे. त्याचे कुटुंबियांना विचारा काय अवस्था असते. सकाळी घरुन गेलेला माणूस रात्री परत येईल की नाही याची खात्री नसते. तरी त्याला मात्र पगार तुटपुंजा आहे. ज्यात त्याला उदरनिर्वाह करणे अवघड असते. या सरकारचे परिवहन मंत्री आंदोलन चिरडू पाहत आहे. हे तेच मंत्री आहे ज्यानी खंडणीखोर वाजे आणला होता. या सरकारने जर एस.टी. महामंडळ विलीनीकरण करुन कर्मचार्‍यांचा प्रश्न न सोडवता खाजगी कर्मचारी घालण्याचा प्रयत्न केल्यास त्याना डेपोत घुसू देणार नाही व भाजपा सदैव एस.टी. कर्मचार्‍यांच्या बरोबर असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दत्ता नवले यांनी तर सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आमदार, खासदार व मंत्र्याना रस्त्यावर फिरू देणार नाही व त्याच्या गाड्या फोडू. एस. टी. कर्मचार्‍यांनो आता तुम्ही आत्महत्या करु नका, आत्महत्या या राज्यकर्त्याना करावी लागेल, अशी वेळ आणू, असा इशारा दिला.

भाजपा महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्षा सौ.सोनालीताई नाईकवाडी म्हणाल्या, या सरकारला जनता त्याचे प्रश्न महत्वाचे नसून कोणीतरी गांजाडी, मंत्र्याचे जावई महत्वाचे आहे. राज्यातील एखादा घटक वंचित राहत असेल तर सरकारला त्याची लाज वाटली पाहिजे.एस. टी. विलीनीकरण करणाला सरकार पैसे नाही म्हणतात मात्र मुख्यमंत्र्याचे पोरांच्या दौर्‍याला पैसे आहेत, असा आरोप केला. तर भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी एस.टी.चे हे महामंडळ म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. या महामंडळावर कधीही एस.टी.चा माणूस न घेता राजकारणातील पुढारीच बसवले जातात व ते भ्रष्टाचारात माहीर आहे, असा आरोप केला

यावेळी सूत्रसंचालन अशोक कडलग यांनी केले तर एस.टी.चे कर्मचारी सदाशिव कचरे, बाळासाहेब गंभिरे, अशोक फापाळे, संतोष पन्हाळे, नईम शेख, सौ दराडे, मनिषा लांडगे, सौ. मंदा आल्हाड, फसाबाई नांगर, शिवाजी भोईर, मधुकर गोडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

या आंदोलनात राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेले शिवसेनेचे पं.स.चे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य मारूती मेंगाळ उपस्थित राहून पाठिंबा दिल्याने शिवसेनेला घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू होती. यावेळी एस. टी. आंदोलनाला पाठिंबा देताना म्हणाले, सरकार जरी शिवसेनेचे महाविकास आघाडीचे असले तरी तालुक्यातील एस. टी. कर्मचार्‍यांसोबत आपण कायम राहिलो आहे. माझे राजकीय, सामाजिक वाटचालीत एस. टी. कर्मचार्‍यांचे योगदान राहिले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची कामगार संघटना तुमच्या बरोबर आहे.अनेक मंत्री, नेते हे मुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांना सांगत आहे की, एस. टी. कर्मचार्‍यांच्या मागण्याकडे लक्ष द्या. लढा कोणाविरुद्ध आहे हे महत्वाचे नाही लढा कष्टकरी, कर्मचार्‍यांच्या न्याय हक्काचा आहे हे महत्वाचे आहे, असे सांगुन लढा पक्षाविरुद्ध असला तरी आम्ही तुमच्या बरोबर राहू, असा विश्वास व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com