एसटीचे 3 हजार 647 कर्मचारी कामावर हजर

130 कर्मचार्‍यांबाबत आज निर्णय : 400 लालपरी रस्त्यावर
एसटीचे 3 हजार 647 कर्मचारी कामावर हजर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तब्बल साडेपाच महिन्यांच्या संपानंतर अखेर न्यायालयाने लक्ष घालून एसटी कर्मचार्‍यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर परतण्याचे आदेश दिले आहेत. ही मुदत आज संपणार आहे. दरम्यान, एसटीचे वाहक, चालक आणि वर्कशॉपसह कार्यालयीन असे 3 हजार 647 म्हणजे शंभर टक्के कर्मचारी मुदत संपण्याच्या एक दिवस आधी म्हणजे गुरूवार (दि.21) रोजी कामावर हजर झाले आहेत. शिल्लक राहिलेल्या 130 कर्मचार्‍यांचे अर्ज काल आले असून त्यांना आज कामावर रुजू करून घेण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

साडेपाच महिन्यांपासून महाराष्ट्राची लाईफलाईन असणार्‍या एसटीची चाके कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे डेपोत रुतून बसली होती. अखेर न्यायालयाचा आदेश आणि मुंबईत शरद पवार यांच्या घरासमोर घडलेल्या नाट्यानंतर मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी कामावर परतत होते. गुरूवारीपर्यंत 2 हजार 622 कामावर येवून ड्युटी करत होते. यामुळे एसटी महामंडळाच्या 400 गाड्यातून 1 हजार 200 फेर्‍या सुरू होत्या.

यासह 221 कर्मचारी साप्ताहिक सुट्टीवर होते. तर रजा अथवा पगारी सुट्टीवर असणार्‍यांची संख्या काल 606 होती. इतर आगारात कामावर असणार्‍यांची संख्या 63 होती. तर पाच कर्मचारी निलंबित असून 130 कर्मचारी कागदोपत्री गैरहजर असले तरी त्यांनी काल कामावर हजर होण्याची अर्ज केलेला आहे. या कर्मचार्‍यांना आज (दि.22) रोजी कामावर घेण्यात येणार आहे.

ऑक्टोबर, 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता. महामंडळाने कर्मचार्‍यांच्या काही मागण्या मान्य केल्या. मात्र, त्याला न जुमानता कर्मचारी संपावर ठाम होते. अखेर उच्च न्यायालयाने दखल घेऊन कर्मचार्‍यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर येण्यास सांगितले. ज्यांच्या विरोधात बडतर्फी, निलंबन अथवा अन्य कारवाया सुरू असतील, त्या मागे घेऊन समज देऊन त्यांना कामावर घेऊ.

मात्र, 22 तारखेनंतर जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असे समजून त्यांची सेवा समाप्त केली जाईल, असे परिवहनमंत्र्यांनी सांगितले आहे. एसटी महामंडळाने संपातील कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्यासाठी आतापर्यंत सात वेळा संधी दिली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर आता कर्मचारी कामावर हजर झालेले आहे. कामावर हजार झालेल्यामध्ये 1 हजार 104 चालक आणि 1 हजार 187 वाहक आहेत. यासह यांत्रिक विभागात 756, प्रशासकीय 477, आणि चालक-वाहक असे 123 कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

येत्या 2 तारखेपासून शाळांसुट्या लागणार आहे. यामुळे मुलांना मामाच्या गावाकडे जाण्यासाठी एसटी सज्ज राहणार आहे. एसटीच्या बसेस सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा विषय राहणार आहे. मध्यल्या पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीत एसटी बंद असल्याने नागरिकांनी पर्यायी व्यवस्थेचा अवलंब केलेला आहे. यामुळे बसेस सुरू झाल्यानंतर लगेच प्रवाशी गर्दी होण्याची शक्यता कमी आहे. साधारण आठ दिवसानंतर एसटीची वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

संप काळात एसटी महामंडळाने 381 कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई केली होती. यातील 273 कर्मचार्‍यांची सुनावणी घेऊन त्यांच्यावरील बडतर्फीचे आदेश मागे घेण्यात आलेले आहेत. उर्वरित कर्मचार्‍यांची आजच सुनावणी घेऊन त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येणार आहे. यात 21 प्रशासकीय कर्मचारी, 109 कार्यशाळेतील कर्मचारी, 116 चालक, 128 वाहक, 7 चालक तथा वाहक यांचा समावेश होता.

Related Stories

No stories found.