
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
पुणे-नगर-ठाणे जिल्हाच्या हद्दीवर असलेल्या माळशेज घाटात बोगद्याजवळील महादेव मंदिरासमोरील दरीत एस.टी. चालकाने उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी दुपारी नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात घडली असून, यात गणपत मारुती इंदे, वय-48, राहणार भंडारदरा गाव, ता. अकोले, जिल्हा अहमदनगर असे आत्महत्या करणार्या बस चालकाचे नाव आहे.
गणपत इंदे यांनी माळशेज घाटात एस.टी. थांबवली आणी खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली. सदर एस.टी बस अहमदनगर डेपोची असून अकोले-कल्याण होती. सदर घटना समजताच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी धाव घेत तीन तासांच्या अथक परिश्रमाने 200 फुट दरीत उतरून मृतदेह बाहेर काढून टोकावडे पोलीस यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी टोकावडे पोलिस ठाण्याचे अधिकारी संतोष दराडे व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन टीम जुन्नरचे प्रशांत केदारी, माजी सैनिक रमेश खरमाळे, राजकुमार चव्हाण, आदित्य आचार्य, श्याम कबड्डी, लखन संकेत बोंबले, सुनील शिंदे, बाळू साबळे, पांडुरंग पगार, सुनील साबळे आदींनी मृतदेह दरीतून बाहेर काढण्यास मदत केली.
इंदे याचे कालच मंगळवारी वेतन झाले होते. आर्थिक ताणाताण आणि कमी पगार यामुळे आत्महत्या केल्याचे सांगीतले जात आहे. या घटनेचा पुढील तपास टोकावडे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष दराडे करत आहेत.