एसटी बसेस बंद असल्यामुळे बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य

एसटी बसेस बंद असल्यामुळे बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य

राजुरी |वार्ताहर| Rajuri

बाभळेश्वरसह मोक्याच्या ठिकाणी असणार्‍या नगर-मनमाड महामार्गावरील अनेक बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले असून अनेकांनी या आवारामध्ये ट्रकसारखी साधने आणून लावली असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसापासून एसटी कर्मचार्‍यांचा संप चालू आहे. नगर जिल्ह्यातील कर्मचारीही या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे नगर-मनमाड रोडवरील अनेक बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकात मोठ्या प्रमाणात शुकशुकाट दिसत असून यामध्ये काही वाहनधारकांनी आपले वाहन या बसस्थानकाच्या आवारात आणून पार्किंग केलेले दिसत आहे. संपात आगार प्रमुखांचे ऑफिसही बंद अवस्थेत आहे. या परिसरात मात्र तळीरामाचा मोठ्या प्रमाणात वावर होताना दिसत आहे. बाभळेश्वर येथील बसस्थानकामध्ये तर दिवसा व रात्रीच्या वेळेस वापर होतानाचे चित्र अनेक नागरिकांना सध्यातरी पाहावयास मिळत आहे. या एसटी बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे ही साम्राज्य पसरलेले आहे. नागरिकही लघुशंकेसाठी या परिसराचा उपयोग करीत आहे.

एकूणच गेल्या एक ते दीड महिन्यापासून सुरू असणारा एसटी बसचा संप व न वापरात येणार्‍या बस स्थानकाचा परिसर यामुळे या परिसरातील अनेक नगर-मनमाड रोड जवळ असणार्‍या एसटी बस स्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. तसेच अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणार्‍यांचीही संख्या मोठी वाढ झाली आहे. या गाड्या रोडच्या मधील भागी उभ्या राहून प्रवासी भरण्याचे काम करत असल्यामुळे याचाही या रोडवरून वाहतूक होणार्‍या साधनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे बाभळेश्वर चौकात वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. याकडे मात्र स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा यांनी लक्ष घालून येथील वाहतूक सुरळीत कशी होईल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ व वाटसरु करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com