नारीशक्तीच्या हाती ‘लालपरी’चं स्टिअरिंग!

सिन्नर-नाशिक मार्गावर नव्या पर्वाची सुरूवात, नगर जिल्ह्यातून तिघींची निवड
नारीशक्तीच्या हाती ‘लालपरी’चं स्टिअरिंग!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीमध्ये महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटी प्रवाशात वाढ होऊन उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यातच आता एसटीचे सारथ्य महिला चालकांच्या हाती सोपविण्यात येत आहे.

एसटी महामंडळात महिलांनी कंडक्टर म्हणून अनेक वर्षांपासून जबाबदारी सांभाळली आहे. आता एसटी सारख्या अवजड वाहनाचे सारथ्य प्रथमच महिला चालक करणार आहेत. राज्य परिवहनच्या सेवेत महिला चालक देखील रुजू झाल्या असून नुकत्याच माधवी संतोष साळवे (बि. क्र. 41744) यांनी सिन्नर-नाशिक मार्गावर एसटी बस चालवून नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. माधवी साळवे यांना पाहून सिन्नर तालुक्यातील प्रवासी आश्चर्यचकीत त्यांचे कौतुक करीत त्यांना प्रोत्साहन देत आहे.

एसटी महामंडळाचा नुकताच 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 1 जून 1948 पुणे ते नगर मार्गावर पहीली एसटी बस धावली होती. सध्या 16 हजार बसेसद्वारे सुमारे 90 हजार कर्मचारी एसटी महामंडळात सेवा बजावत आहेत. एसटीमध्ये सरळ सेवा भरती सन - 2019 अंतर्गत चालक तथा वाहक पदासाठी भरती झाली होती. आता महिला चालक कम वाहक पदाकरीता एकूण 206 महिला उमेदवारांची भरती झाली होती.

त्यात अनुक्रमे पुणे - 31, नागपूर आणि अमरावती- 21, बुलढाणा -17, नाशिक - 15, जळगाव - 13, यवतमाळ -12, वर्धा आणि सांगली -11, भंडारा - 9, औरंगाबाद आणि सातारा - 8 , परभणी -7 असे 206 महिला उमेदवार पात्र ठरले. त्यानंतर खडतर प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी या फेर्‍यांतून छाननी होऊन अंतिम 28 महिला चालकांची नेमणूक झाली आहे. त्यात सर्वाधिक उमेदवार नाशिक - 12, औरंगाबाद आणि पुणे येथून प्रत्येकी 5,नगर येथून 3, परभणी येथून 2 आणि जालना येथून 1 उमेदवाराची निवड झाली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com