पोलीस बंदोबस्तामध्ये लालपरी पडली आगाराबाहेर

पोलीस बंदोबस्तामध्ये लालपरी पडली आगाराबाहेर

शेवगाव l शहर प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात येवून एसटी कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांचा दर्जा, अधिकारी व वेतन श्रेणी मिळावी या प्रमुख मागणीच्या पाठपुराव्यासाठी राज्यातील अनेक आगारातील कर्मचा-यांनी गेल्या अनेक दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनात शेवगाव आगारातील कामगार कर्मचारी दि.९ नोव्हेंबर पासून सहभागी झाले होते.

मात्र कामगारांच्या आंदोलनाची ही कोंडी शुक्रवारी फुटली असून आंदोलनात सहभागी झालेले आगारातील बहुतेक कर्मचारी कामावर हजर झाल्याने शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास आगारातून पोलीस बंदोबस्तात नगर व गेवराईकडे एसटी बस रवाना झाल्या आहेत. एसटी कर्मचा-यांच्या या बेमुदत काम बंद आंदोलनात आगारातील ९४ चालक, १०२ वाहक, ५१ यांत्रिकी विभागातील कर्मचारी तसेच १७ कार्यालयीन कर्मचा-यांपैकी बहुतेक कर्मचारी सहभागी झाल्याने गेली १७ दिवस आगारातून एकही बस बाहेर पडली नाही.

एसटी कर्मचा-यांच्या शासनात विलीनीकरण या महत्वपूर्ण मागणीला शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शेवगाव आगारातील चालक दिलीप हरिभाऊ काकडे यांनी आगारात उभ्या असलेल्या एसटी बसच्या पाठीमागील बाजूला गळफास घेवून आपले जीवन संपविले. त्यामुळे आगारातील एका कर्मचाऱ्याचे बलिदान व्यर्थ जावू नये म्हणून आगारातील सर्व कर्मचारी या आंदोलनात स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते.

एसटी कर्मचा-यांच्या या आंदोलनास शहर व तालुक्यातील विविध राजकीय पक्ष तसेच संस्था संघटनांनी पाठींबा जाहीर केल्याने कामगारांच्या या आंदोलनास चांगलेच बळ मिळाले होते. मात्र कामगार आंदोलनाची व्याप्ती लक्षात घेवून विभागीय नियंत्रक यांच्या आदेशान्वये आगार व्यवस्थापक वासुदेव देवराज यांनी आगारातील ९ कर्मचा-यावर निलंबनाचा बडगा उगारला.

दरम्यान परिवहन मंत्र्यांनी कामगारांना हजर होण्यासाठी आज शुक्रवारची अंतिम मुदत (अल्टीमेटम) दिल्याने आगारातील कामगार कृती समितीच्या पदाधिकार्यांनी आगार व्यवस्थापकांशी चर्चा करून कामावर हजर होण्याची तयारी दर्शविल्याने आगार व्यवस्थापकांनी जिल्ह्याचे विभागीय नियंत्रक यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आज शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास आगारातून नगर व गेवराई कडे जाणाऱ्या एसटी बस पोलीस बंदोबस्तात रवाना केल्या आहेत. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी आगार परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. नुकत्याच शाळा सुरु झाल्याने तालुक्याच्या ग्रामीण परिसरातून तालुक्याच्या तसेच मोठ्या लोकसंख्येच्या नजीकच्या गावात शाळेसाठी जाणा-या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करण्याची वेळ आली . त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे कर्मचा-यांच्या या आंदोलनाकडे लक्ष लागले होते. आता काही प्रमाणात बससेवा सुरु होणार असल्याने असंख्य पालक व विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com