‘लालपरी’ च्या इतिहासाचे साक्षीदार काळाच्या पडद्याआड

एसटीचे पहिले वाहक केवटे यांचे निधन
‘लालपरी’ च्या इतिहासाचे साक्षीदार काळाच्या पडद्याआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर ते पुणे या दरम्यान धावलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या एसटी बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे बुधवारी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने लालपरीच्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची पहिली एसटी बस 1 जून 1948 रोजी अहमदनगरच्या माळीवाडा भागातून पुण्यापर्यंत धावली. त्या बसचे पहिले चालक म्हणून किसन राऊत आणि पहिले वाहक लक्ष्मण केवटे होते. हे दोघेही अहमदनगर जिल्ह्यातीलच होते. राऊत आता हयात नाहीत, तर केवटे यांनीही बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

राज्यातील नगरमधून पहिली एस. टी. धावली. त्यामुळे महाराष्ट्राची पहिली इलेक्ट्रिक बसही नगर ते पुणे या मार्गावरच 1 जून 2022 रोजी सुरू करण्यात आली. त्यावेळीही केवटे उपस्थित होते. नगरमधून त्यांच्याच हस्ते या बसला हिरवा झेंडा दाखवला गेला. म्हणजे महाराष्ट्राची पहिली बस ते इलेक्ट्रिक बस या दोन्ही सुवर्ण घटनांचे ते साक्षीदार होते. दरम्यान, गुरूवारी नगरमधील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी त्यांचे नातेवाइक व एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या निधनामुळे एसटीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यंदाच्या 1 जून रोजी पहिल्या एसटी प्रवासाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यापूर्वीच केवटे यांचे निधन झाल्याने एसटीच्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com