साडेचार महिन्यांपासून लालपरी ठप्प

राज्य परिवहन मंडळाचे दररोज 50 ते 60 लाखांचे नुकसान
साडेचार महिन्यांपासून लालपरी ठप्प

अहमदनगर ।प्रतिनिधी। Ahmednagar

सर्वसामान्याच्या प्रवासाचे साधन असलेल्या एसटीच्या चाकांना करोनामुळे ब्रेक लागला आहे. साडेचार महिन्यांपासून जिल्ह्यातील 11 आगारांतील राज्य परिवहन मंडळाच्या 750 बस जागेवर उभ्या आहेत. यामुळे मंडळाचे दररोज 50 ते 60 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.

नगर विभागात काम करणारे 4 हजार 300 कर्मचारी घरी बसून असून करोना लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर एसटीच्या काही फेर्‍या सुरू झाल्या, मात्र करोनाच्या भितीमुळे प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने परिवहन मंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. करोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नसल्याने अजून किती दिवस लालपरी आगारातच उभी राहील, याची अनिश्चितता आहे.

नगर जिल्हा विस्ताराने मोठा असल्याने जिल्ह्यात एसटीचे 11 आगार आहे. या 11 आगारांमध्ये 750 बस आहेत. यातील सुमारे 650 बस या दररोज रस्त्यावर धावत असतात. करोनामुळे एसटीची वाहतूक 22 मार्चपासून बंद आहे. यामुळे नगर विभागाच्या दररोजच्या जवळपास चार हजार 200 फेर्‍या बंद आहेत. जिल्ह्यात दररोज किमान 2 लाख 40 हजार किलोमीटर अंतर या बस धावत होत्या. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बंद असल्याने नगर विभागात उत्पन्न ठप्प झाले आहे.

जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे 4 हजार 300 कर्मचारी काम करतात. परिवहन मंडळाच्या अर्थचक्राला आधार देणारी ही लालपरी रस्त्यावर यावी अन् वाहतूक सुरू व्हावी, यासाठी कर्मचारीही आतुर आहेत. साडेचार महिन्यांपासून बस उभ्या असल्याने त्यांच्या दुरूस्तीचा प्रश्न निर्माण होणार आहे. करोनामुळे नगर विभागाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले असून, अजून किती दिवस चाके ठप्प राहतील, याचा अंदाज नसल्याने कर्मचारीही धास्तावले आहेत.

45 बसेस मालवाहतुकीसाठी तर 32 प्रवाशांसाठी

एसटी महामंडळाच्या नगर विभागाने 11 आगारांमध्ये 45 बस या माल ट्रक म्हणून सुरू केल्या आहेत. तर, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने करोना नियमांचे पालन करून प्रवाशी वाहतुकीसाठी 32 बस सुरू आहेत. यामुळे थोड्याफार प्रमाणात एसटी महामंडळाला उत्पन्न मिळत आहे. शेतीमाल, कंपन्यांचा माल वाहतूक करण्यासाठी नगर विभागाने 45 बस मालट्रक म्हणून तयार केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या शेतामधून, कंपनीमधून तयार होणारा माल विक्रीसाठी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी नेला जात आहे.

जिल्ह्यातील 11 आगारांमध्ये 45 माल वाहतूक बस तयार करण्यात आल्या आहेत. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, लघु उद्योजक यांनी आपला माल या माल वाहतूक बस मधून विक्रीसाठी घेऊन जावा. या मालाची वाहतूक बाजारदरापेक्षा कमी दरात केली जात असल्याने त्याचा फायदा शेतकरी आणि व्यापार्‍यांना होणार आहे.

- विजय गिते, (विभाग नियंत्रक)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com