
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावी परीक्षेला गुरूवारपासून जिल्ह्यातील 179 केंद्रांवर सुरूवात झाली. या परीक्षेत पहिल्याच मराठीच्या पेपरला 1 कॉपी केस सापडली. उर्वरित ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पडल्याचे सांगण्यात आले.
दहावीच्या परीक्षेस यंदा जिल्ह्यातून 69 हजार 534 विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. करोनामुळे मागील वर्षी आपापल्या शाळेमध्येच परीक्षा झाली होती. यंदा मात्र ती 179 केंद्रांवर होत आहे. संवेदनशील केंद्रांवर बैठे पथक नेमले असून भरारी पथकांचीही नजर राहणार आहे. गुरूवारी 11 वाजता मराठीचा पेपर होता.
सकाळी साडेदहा वाजताच विद्यार्थी केंद्रावर हजर झाले. या पेपरसाठी 59 हजार 821 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 58 हजार 910 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 911 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर होते. दरम्यान, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या पथकाने नगर शहरातील सेंट झेविअर परीक्षा केंद्रावर 1 विद्यार्थी कॉपी करताना पकडला. दहावी व बारावीसाठी हे संवेदनशील केंद्र आहे. त्यामुळे येथे बैठे पथकासह भरारी पथकाचीही विशेष नजर असते.