श्रीरामपूर शहराला अतिक्रमणाचा अजगरासारखा विळखा

गरिबावर हातोडा, इतरांवर मेहरबानी; अधिकार्‍यांची मनमानी; पालिकेचा अजब कारभार
श्रीरामपूर शहराला अतिक्रमणाचा अजगरासारखा विळखा

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

वाहतुकीला अडथळा होतो म्हणून श्रीरामपूर नगर पालिकेच्या कर्तव्यदक्ष अतिक्रमण विभागाने एका गरीब हातगाडी चालकासह कुटुंबाला थेट मुख्यअधिकारी यांच्या दालनात उभे केले, पण शहरात अजगरासारखा पडलेल्या अतिक्रमणाच्या विळख्यासंदर्भात अनेक तक्रारी करूनही पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही.

पालिकेच्या अधिकार्‍यांचा मनमानी कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. श्रीरामपुरातील अतिक्रमणाच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एक गरीब व्यावसायीक हातगाडीवर संध्याकाळी पाच नंतर व्यवसाय करतो. पण या हातगाडीमुळे वाहतुकीला अडथळा येतो. म्हणून ठरावीक लोकांनी पालिकेत तक्रार केली. या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन अतिक्रमण विभागाने ही हातगाडी जप्त करुन गरिबाला थेट मुख्याधिकारी यांच्या दालनात उभे केले.

श्रीरामपूर शहरात मेनरोड, रेल्वे स्टेशन परिसर, शिवाजी चौक, शिवाजी रोड, संगमनेर रोड, भगतसिंग चौक, वेस्टन चौक, राम मंदिर चौक, नेवासा रोड, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आदि ठिकाणी माजी नगरसेवक, व्यवसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर हातगाड्या, भाजीपाला विक्रेते असतात. चोथाणी हॉस्पिटल समोरील रस्त्याला तर भाजी मंडईचे स्वरूप आलेले आहे.

मोकाट जनावरे, कुत्रे, डुकरे, चहाच्या दुकानासमोर उभी असणारी वाहने, रिक्षा, कळ्यापिवळ्या गाड्या, दुकानाचे बोर्ड रस्त्यावर लावल्या जातात. अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडे जाणारा रस्ता शोधावा लागतो. नेवासा रोडवर तर एकाने रस्त्यावरच म्हशीचा गोठा उभारला आहे. महात्मा गांधी पुतळ्याजवळ वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी वाहने, रिक्षा हातगाड्या उभ्या असतात. येथेही दुकानदाराचे अतिक्रमणे आहेत. आदि कारणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही का? एखाद्या अजगराप्रमाणे श्रीरामपूर शहरात अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे.

अतिक्रमणामुळे वाहतुकीलाच नव्हे तर नागरिकांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागतो. अनेक महिन्यापासून शहरातील अनेक महिला, प्रतिष्ठित नागरिकानी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या परंतु कार्यक्षम प्रशासन व अतिक्रमण विभाग यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत त्याला केराची टोपली दाखवली. ज्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हातगाडीवर आहे, त्याच्याविरुद्ध कुणीतरी तक्रार केली म्हणून एका गरीब कुटुंबाची हातगाडी लागली म्हणून त्याच्या विरोधात तातडीने कार्यवाही केली जाते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com