श्री क्षेत्र भेंडा बुद्रुक : आंब्याचे झाड नसलेले गाव

श्री क्षेत्र भेंडा बुद्रुक : आंब्याचे झाड नसलेले गाव

फळांचा राजा आंबा. सर्वांना हवेसे वाटणारे मधूर असे फळ असलेल्या आंब्यांच्या झाडांची लागवड व जोपासना मोठ्या प्रेमाने केली जाते. मात्र यासाठी भेंडा बुद्रुक हे गांव यास अपवाद आहे. या गावात आंबे विकली जातात, आंबे खाल्ली जातात परंतु आंब्यांचे झाड मात्र लावले जात नाही असे हे एकमेव गांव असावे.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील वास्तव्याच्या काळात बालब्रम्हचारी, बाल संन्यासी श्री संत नागेबाबांनी मठाच्या परिसरामध्ये अनेक झाडांची लागवड केली त्यात आंब्यांची झाडे ही लावली होती. निसर्ग प्रेमी बाबांनी या झाडांची उत्तम प्रकारे जोपासनी केली होती. झाडांना स्वतः पाणी देणे यासारखी कामे स्वतः आवडीने करीत असत.एकदा गावातील एका बकरीने बाबांनी लावलेले व जोपासलेले आंब्याचे रोप पूर्णपणे खाऊन टाकले. श्री संत नागेबाबांनी रागाच्या भरात बकरीला "मरजाव" असे म्हणताच बकरी जागेवर मरण पावली. संन्यासी बाबांचा शब्द लगेचच खरा ठरला. बकरी मरण पावल्यामुळे श्री संत नागेबाबा अत्यंत दुःखी झाले याचा त्यांना पश्चाताप झाला. त्यामुळे श्री संत नागेबाबांनी बाभळीचा लांब काटा घेवून स्वतःच्या जिभेला टोचून ठेवला व मौन धारण केले. या घटनेची वार्ता गावात परसल्याने गांवकरी मठात जमा झाले, त्यांनी श्री संत नागेबाबांची विनवनी केली व जिभेचा काटा काढून टाकण्यासाठी विनवले. तुम्ही सांगाल ती शिक्षा गांवकरी भोगण्यास तयार आहेत अशी विनंती केली.भक्तांच्या व गांवकरी यांच्या विनंतीस मान देवून श्री संत नागेबाबांनी जिभेला टोचून ठेवलेला काटा काढला. त्यानंतर त्यांनी सांगितले जर मी आंब्याचे झाड लावले नसते तर ते झाड बकरीने खाल्ले नसते. आणि आज ही वेळ आली नसती. त्यामुळे येथून पुढील काळात भेंडा बुद्रुक गांवच्या शिवारात आंब्याचे झाड लावील त्यांचा संपूर्ण वंश खंडण होईल असा शाप श्री संत नागेबाबांनी दिला. तेव्हा पासून भेंडा बुद्रुक गावाच्या हद्दीत आंब्याचे एकही झाड नाही. आंब्याचे झाड लावल्याने काय होते? बाबांचा शाप खोटा आहे असे म्हणून गावांतील तीन-चार जणांनी स्वतःच्या शेतात आंब्यांची झाडे लावली. याचा परिणाम असा झाला की त्या व्यक्तींचे संपूर्ण वंश खंडण झाले. आज त्यांच्या कुटूंबापैकी एक ही व्यक्ती-वारस जिवंत नाही. त्यामुळे शापाची प्रचिती आल्याने त्यानंतर कोणीही आंब्याचे झाड लावण्याचे धाडस केलेले नाही अशी आख्यायिका आहे. श्री संत नागेबाबांवर गावकऱ्यांची अत्यंत श्रध्दा आहे. मनोकामना पूर्ण करणारे जागृत देवस्थान आहे. म्हणून गावाचे शिवरात आंब्याचे झाड लावले जात नाही. आपोआप उगवले तरी ज्याच्या नजरेस पडले तो ते झाड उपटून टाकतो. आंबे विकले जातात, आंबे खाल्ले जातात, आंब्याचे झाड मात्र नाही असे भेंडा बुद्रुक हे एकमेव गांव आहे.

बालब्रम्हचारी श्री संत नागेबाबा...

काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार। हरिभक्त थोर भूमंडळीl

श्री संत नागेबाबा हे घोर तपस्वी, रिद्धीसिध्दी संपन्न बालब्रम्हचारी शिवशंकराचे उपासक होते.इ.स. १६०० मध्ये ते भेंडा येथे आले. कोठून आले त्यांचे नांव गांव कोणते राज्य कोणते ? अगदी त्यांचा नाव काय आहे. जात धर्म कोणता आहे याबाबत कोणालाही काहीही माहिती नाही. गावांनीही विचारले नाही अथवा बाबांनी स्वतः याबाबत काही सांगितले नाही.

यातायाती धर्म नाही विष्णुदासा। निर्णय हा ऐसा वेदशास्त्री॥

नेवासा तालुक्यातील भेंडा बुदुक हे त्यावेळी अत्यंत छोटे गांव. या गावात जून्या पुरातन काळातील हेमाड पंथी शिवमंदिर होते. आज श्री संत नागेबाबा म्हणून ओळखले जाणारे नागेबाबा या शिवालयात आले. त्यांनी शिवाची पुजा व भक्ती केली. याठिकाणी त्यांचे चित्त रमले. तपश्चर्या ध्यान करण्यात मग्न झाले. श्री संत नागेबाबा विषयी बोलतांना अनेकांनी सांगितले आहे की, बाबांच्या अंगावर एकही वस्त्र नसे. ते संपूर्ण निवस्त्र, जटा वाढलेल्या अशा गोसावी च्या रूपातच वावरत असत.अंगावर एकही कपडा नसल्यामुळे लोक त्यांना नंगेबाबा म्हणून संबोधू लागले. पूढे नंगेबाबा वरुन नागेबाबा हे नाव प्रचलित झाले.

श्री संत नागेबाबा बालब्रम्हमचारी असल्याने त्यांना स्त्री सानिध्य व स्पर्श वर्ज्य होता. श्री संत नागेबाबांचा उपजिवीकेचा मार्ग म्हणजे ते स्वतः भेंडा खुर्द, भेंडा बुद्रुक, तरवडी व आसपासच्या गावांत माधुकरी मागून उपजीवीका करीत. माधुकरी मागण्यासाठी ते भल्या पहाटे गावांतून निघत असे, पहाटे पाठीवर झोळी टांगून गावांतून फिरून माधुकरी गोळा करीत, गावातून माधुकरी मागतांना नागेबाबा आलख निरंजन म्हणून आरोळी देत ही हाक ऐकून दान करणारे भक्त झोळीमध्ये माधुकरी टाकीत; परंतु बाबांशी बोलायचे नाही बाबाही कधी पाठीमागे वळून पाहत नसत वा बोलत नसत भिक्षा मागण्याच्या या पद्धतीला भैरव झोळी म्हणून ओळखले जाते.श्री संत नागेबाबा सदैव हिंदी भाषेतूनच बोलत त्यावरुन ते उत्तर प्रदेशातून आले असावेत अशी गावकऱ्यांची धारणा आहे.इ.स. १७०० मध्ये श्री संत नागेबाबांनी भेंडा बुद्रुक (ता. नेवासा) गांवी जिवंत समाधी घेतलेली आहे. त्यांच्या समाधी स्थळावर त्यांचे शिष्य गोदावरी व शामगिरी यांनी मठाचे निर्माण केले. काही काळानंतर दोन्ही शिष्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याही ग्रामस्थांनी मरणोत्तर समाधींची स्थापना केलेली आहे.

सद्गुरु किसनगिरी बाबांचा उपदेश...

भेंडा गावातील ग्रामस्थ श्री क्षेत्र देवगड येथे बालब्रम्हचारी सद्गुरु किसनगिरी बाबांच्या दर्शनास जात त्यावेळी सद्गुरु किसनगिरी बाबा या ग्रामस्थांना सांगत की, बाबांनो तुमच्या गावातच बालब्रम्हचारी श्री संत नागेबाबांचे जागृत शक्तीस्थान आहे. तिथे त्यांची सेवा करा, तिथली सेवा सोडून माझ्याकडे कशासाठी येता? यावरुनच श्री संत नागेबाबा देवस्थानचे महत्व स्पष्ट होते.

श्री संत नागेबाबा यांची यात्रा प्रत्येक वर्षी श्रावणी तिसऱ्या सोमवारी भरते.यात्रेनिमित्त गंगेच्या पाण्याच्या कावडी आणल्या जातात या कावडीची बाबांच्या पादुका असलेल्या पालखीची सवाद्य मिरवणुक काढली जाते. या यात्रेनिमित्त आमटी भाकरीचा भंडारा केला जातो. ही आमटी घेण्याकरीता भाविकांची अक्षरश: गर्दी पडते, परंतु कितीही लोकांनी नेली तरी ती सर्वांनाच पुरते हे एक विशेष आहे. सोमवारी यात्रेच्या दिवशी गंगेच्या पाण्याने श्री संत नागेबाबांच्या समाधीस व शिवलिंगास जलाभिषेक घातला जातो. रात्री छबीना व पालखी मिरवणुक काढण्यात येते. या मिरवणुकीत लहान थोर भक्तीभावाने सहभागी होतात.

पुर्वी श्री संत नागेबाबा मंदिर हे जुन्या पद्धतीचे पांढरी माती व लाकुड-दगड यांचा वापर करुन (खण) बांधलेले होते. श्री संत नागेबाबांच्या कृपेची जाणी असलेल्या ग्रामस्थांनी लोक वर्गणी मधून लाखो रुपये खर्चून जूने मंदिराच्या ठिकाणी नवीन मंदिर बांधले आहे. तसेच २०१४ मध्ये माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व तत्कालीन आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे सततच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी नागेबाबा देवस्थानचा "ब" वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करून २ कोटी रुपयांचा निधी मिळवून सर्वसोयींनी युक्त भव्य असे भक्त निवास बांधण्यात आले आहे.

श्री संत नागेबाबाचे नांव देऊन ज्यांनी सचोटीने उद्योग व्यवसाय व्यापार केला त्यांची भरभराटच झाली. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री संत नागेबाबा पतसंस्था १५ जुलै १९९९ रोजी ३०० सभासद व ३० हजार रुपयांच्या भाग भांडवलावर भेंडा गावामध्ये सुरु झाली. अल्पावधीत पतसंस्थेने बांधलेल्या स्वमालकीच्या इमारतीचे उद्घाटन ह. भ. प. गुरुवर्य मिराबाई महाराज मिरिकर यांच्या शुभहस्ते व अखिल भारतीय महानुभव परिषदेचे अध्यक्ष महंत नागराजजी बाबा यांच्या उपस्थितीत झाला. साधूसंताच्या नावाने सुरु केलेल्या श्री संत नागेबाबा पतसंस्थेची भरभराट होऊन मल्टीस्टेट मध्ये रुपांतर होऊन कोट्यावधी रुपयांचे भागभांडवल व स्थावर मालमत्ता निर्माण झाली आहे. हे सर्व श्री संत नागेबाबा व संत महंताचीच कृपा असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष कडुभाऊ काळे हे मोठ्या श्रद्धेने सांगतात. श्री संत नागेबाबांच्या नावाने सुरु केलेले अनेक उद्योग भरभराटीस गेलेले अनेक उदाहरणे पहावयास मिळतात.

गेल्या अनेक वर्षापासून ह. भ. प. गुरुवर्य मिराबाई महाराज यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाने श्री संत नागेबाबा यात्रेनिमीत्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या हरीनाम सप्ताहाचा हजारो भक्तजन भक्ति भावाने लाभ घेतात. जागृत देवस्थान म्हणून श्री संत नागेबाबा देवस्थानचा लौकिक आहे. अनेकांना याचा प्रत्यय आलेला आहे.

- सुखदेव एकनाथ फुलारी

(मो.नं. ९४२३७४९२७५)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com