सरकार अजूनही प्रतिसाद देणार नसेल तर आंदोलन आणखी तीव्र करणार
सार्वमत

सरकार अजूनही प्रतिसाद देणार नसेल तर आंदोलन आणखी तीव्र करणार

दूध उत्पादकांच्या आंदोलनाला राज्यभर जोरदार प्रतिसाद

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

दुधाला किमान 30 रुपये दर मिळावा या मागणीसाठी किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाच्या 1 ऑगस्टच्या एल्गार कृतीला राज्यभर दूध उत्पादकांचा जोरदार प्रतिसाद लाभला. किसान सभेच्या वतीने 21 जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादक शेतकर्‍यांनी चावडीवर दुधाचा अभिषेक घालत व जनावरे चावडीवर बांधत जोरदार आंदोलन केले.

दुधाला 30 रुपये किमान भाव मिळावा यासाठी राज्य सरकारने प्रति लिटर 10 रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करावे, केंद्र सरकारने बाहेरच्या देशातून दूध व दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचे धोरण तातडीने मागे घ्यावे व दुध पावडरला 50 रुपये प्रति किलो निर्यात अनुदान द्यावे या मागण्यांसाठी 20 जुलै पासून हे आंदोलन सुरू आहे.

काल अकोले येथील टाकळी येथे संघर्ष समितीच्या वतीने चावडीवर गाय बांधत व दगडाला दुधाचा अभिषेक घालत जोरदार आंदोलन करण्यात आले. डॉ. अजित नवले, कारभारी उगले, महेश नवले, डॉ. संदीप कडलग, सुरेश नवले, शरद देशमुख, अशोक आरोटे, रामहारी तिकांडे, शांताराम वाळुंज, लक्ष्मण नवले, विलास नवले, सोमनाथ नवले, दिलीप शेणकर, खंडू वाकचौरे, गुलाबराव शेवाळे, संतोष तिकांडे, दत्ता दातखिळे, श्रीकांत भुजबळ, दीपक तिकांडे, भाऊ तिकांडे, सुरेश दातखिळे यासह शेकडो दूध उत्पादकांनी आंदोलनात सहभाग घेतला.

राज्यभरातील या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने अजूनही दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे सुरूच ठेवल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसात पुन्हा सर्व समविचारी शेतकरी संघटनांबरोबर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com