विशेष मतदार नोंदणीचा नवमतदारांनी लाभ घ्यावा - तहसीलदार हिरे

27 व 28 नोव्हेंबरला मतदार नोंदणीचे विशेष नियोजन
विशेष मतदार नोंदणीचा नवमतदारांनी लाभ घ्यावा - तहसीलदार हिरे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

नजीकच्या काळात होऊ घातलेल्या विविध निवडणुकांमध्ये मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये याकरिता राज्य निवडणूक आयोगातर्फे नवमतदार नोंदणीसाठी विशेष कार्यक्रम जाहीर केला असून जास्तीत जास्त नवमतदारांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कुंदन हिरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात कुंदन हिरे यांनी म्हटले आहे की, 1 जानेवारी 2022 वयाची 18 वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार म्हणून यादीत नाव समविष्ट करू शकतो. नाव नोंदणीसाठी संपूर्ण मतदार संघात मतदार केंद्रनिहाय केंद्रस्तरीय अधिकारी नेमले आहेत. 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याने आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 18 वर्षे पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत. तसेच विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक संस्था यांनी मतदार जागृती करावी, असे आवाहनही कुंदन हिरे यांनी केले आहे. आगामी बहुतेक मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 मध्ये होत असून यासाठी 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

दिनांक 27 व 28 नोव्हेंबर या दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर करण्यात आले आहे. यात नाव नोंदणीसह यादीत पूर्वीपासून नावे असलेल्या मतदारांना आपल्या नावातील दुरुस्ती करता येणे शक्य आहे. दि. 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारा कोणताही व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी भारत निवडणूक आयोग यांचेकडून संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावीत तसेच आपल्या भागातील अथवा कुटुंबातील मयत व्यक्ती, दुबार, समान नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी आपल्या भागातील बी. एल. ओ. अथवा निवडणूक शाखेत विहित नमुन्यात अर्ज दाखल करावा, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com