
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
सामान्य माणसाच्या मनात पोलींसाबद्दल आदर भाव वाढला पाहीजे. गुन्हेगारावर अधिकर्यांचा वचक राहिला पाहीजे. पाथर्डी पोलीस ठाण्याचे विभाजन व नवीन इमारतीसाठीचा पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यासाठी अपुरे पोलीसबळ असल्याने नवीन 500 पोलीस अधिकारी-कर्मचारी मिळावेत, मागणी पत्राव्दारे गृहविभागाकडे केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी दिली.
शनिवारी दुपारी अचानक जिल्हा पोलिस अधिक्षक ओला यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यास भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहायय्क पोलीस निरीक्षक प्रविण पाटील, रामेश्वर कायंदे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, श्रीकांत डांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे भगवान सानप आदी उपस्थित होते. यावेळी ओला म्हणाल, पाथर्डी पोलीस ठाण्याचा परिसर अतिशय चांगला आहे.
गुन्ह्याचे प्रमाण जास्त असल्याने तपासाचे प्रमाणही वाढले पाहिजे. गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादीस वेळेवर मिळाला पाहिजे. ग्रामसुरक्षा दल सक्षम होऊन त्यांची पोलीसांना मदत झाली पाहिजे. कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी असा नेहमीच प्रयत्न सुरु असतो. तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने पोलीस ठाण्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याचाही पाठपुरावा सुरुन आहे.
पोलीस ठाण्याच नवीन इमारत मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच मंजूर होईल. त्याचाही पाठपुरावा चालु आहे. जिल्ह्यात सध्या आदर्श आचारसंहीता सुरु असल्याने त्याची पाहणी करण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले. चार दिवसांपुर्वी घडलेल्या अकोला येथील रस्तालुटीचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. पोलीस हा सामान्य माणसाला आपला वाटला पाहिजे, असा कारभार करा अशा सुचना ओला यांनी दिल्या. सुहास चव्हाण यांनी स्वागत केले.